गया, २९ डिसेंबर २०२२ :बौद्ध नेते दलाई लामा सध्या बिहारमधील बोधगयाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, दलाई लामा यांच्या हेरगिरीचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे बिहार सरकार आणि पोलीस प्रशासन सावध झाले आहे. बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्यावर नजर ठेवणाऱ्या कथित चिनी गुप्तहेराची शांग जियालोन अशी ओळख पटली असून, पोलिसांनी संशयित महिलेचा पासपोर्ट क्रमांक EH2722976 आणि व्हिसा क्रमांक 901BAA2J जारी केला आहे. सुरक्षा यंत्रणांनी संशयित चिनी महिलेचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित चिनी महिला गेल्या दोन वर्षांपासून गया आणि बोधगया परिसरात लपून बसली होती. तिचे केस लहान असून ती बारीक असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही महिला दलाई लामा यांच्याशी संबंधित कार्यक्रमाची माहिती गोळा करत आहे. सध्या या महिलेच्या शोधात पोलीस हॉटेल आणि लॉजमध्ये तिचा शोध घेत आहेत.
- संशयित चिनी महिलेचे रेखाचित्र जारी
दरम्यान, बुधवारी गया पोलिसांनी संशयित चिनी महिलेचे रेखाचित्र जारी केले. शांग जियालोन नावाची ही महिला चीनची गुप्तहेर असू शकते आणि बोधगया येथे दलाई लामा यांच्या प्रवचनाच्या वेळी ती दिसली होती, असा खुलासा पोलिसांनी केला होता. तसेच या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी ९४३१८२२२०८ या नंबरवर कळविण्याचे आवाहन बोधगया पोलिसांनी केले आहे.
गया पोलीस दलाई लामा यांच्या कार्यक्रमाबाबत सक्रिय असून चिनी महिलेचा शोध घेत आहेत. त्याचे स्केच फोटो सोशल मीडियावर टाकून शोध अधिक तीव्र करण्यात आला आहे. तसेच चिनी महिलेचे रेखाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर बौद्ध नेते दलाई लामा यांची सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आली असून, बोधगयामधील हॉटेल्सची झडती तीव्र करण्यात आली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.