बजेट 2025 LIVE: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच शेअर बाजारात उत्साह, मोठ्या घोषणांची अपेक्षा!

नवी दिल्ली १ फेब्रुवारी २०२५: केंद्रीय अर्थसंकल्प 2025 आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करणार आहेत. या महत्त्वपूर्ण आर्थिक दस्तऐवजाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वीच शेअर बाजारात जबरदस्त तेजी दिसून आली आहे. तसेच, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांनी या अर्थसंकल्पावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अर्थसंकल्पापूर्वीच शेअर बाजार उसळला!

गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून BSE सेन्सेक्स 877.20 अंकांनी वधारून 77,637.01 अंकांवर पोहोचला आहे. तसेच, निफ्टी 50 ने 279.10 अंकांची झेप घेत 23,528.60 वर व्यापार सुरू केला. हे वाढलेले आकडे बाजाराच्या सकारात्मक अपेक्षांचे द्योतक मानले जात आहेत. सरकार उद्योग आणि अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या धोरणांची घोषणा करेल, अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे.

काँग्रेसकडून अर्थसंकल्पावर टीका!

काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी अर्थसंकल्पाकडून विशेष काही अपेक्षा नसल्याचे सांगितले. “गेल्या 8-10 वर्षांत भाजप सरकारने अनेक अर्थसंकल्प मांडले, पण अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. आता दिल्लीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काही आकर्षक घोषणा केल्या जाऊ शकतात,” असे ते म्हणाले. तसेच, काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी हा अर्थसंकल्प केवळ एक “अकाउंटिंग एक्सरसाईज” असल्याचे सोशल मीडियावर नमूद केले.

शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या घोषणांची शक्यता!

यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी विशेष तरतुदी होण्याची शक्यता आहे. शिक्षण सेवांवरील GST दर कमी करण्याच्या चर्चा सुरू आहेत. तसेच, स्किल डेव्हलपमेंट, व्होकल ट्रेनिंग प्लॅटफॉर्मची मजबुतीकरण, डिजिटल शिक्षणाचा विस्तार आणि शिक्षक प्रशिक्षण सुधारणा यासंदर्भात महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात.

अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांची प्रतिक्रिया

अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना “थोडी वाट पाहा, सर्व काही 12 वाजेपर्यंत स्पष्ट होईल” असे सूचक वक्तव्य केले.

मोठ्या घोषणांवर सर्वांचे लक्ष!

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकार कर सवलती, उद्योगांसाठी प्रोत्साहनपर उपाय, पायाभूत सुविधा, डिजिटल अर्थव्यवस्था, स्टार्टअप्ससाठी सवलती यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे आणि गुंतवणूकदारांचे या बजेटकडे लक्ष लागले आहे.

थोड्याच वेळात अर्थमंत्री सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात नेमकं काय विशेष असेल? यावर सर्वांच्या नजरा आहेत!

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे