संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून; १ फेब्रुवारीला अर्थमंत्री सादर करणार अर्थसंकल्प!

नवी दिल्ली, १३ जानेवारी २०२३ : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार असून, हे अधिवेशन ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. याबाबत केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

ते म्हणाले, नेहमीच्या सर्वसाधारण सुट्ट्यांसह ६६ दिवसांमध्ये २७ बैठका होणार आहेत. १४ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत दरम्यान, अवकाश घेतला जाणार आहे. तर १२ मार्चपासून अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करण्याने होईल. गेल्या वर्षी जुलैमध्ये राष्ट्रपती झाल्यानंतर, दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हे पहिले भाषण असणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहात आर्थिक सर्वेक्षणही मांडले जाणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा