मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळावे- आमदार समाधान आवताडे

मंगळवेढा १५ डिसेंबर २०२३ : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी खालच्या भागाकडुन वरच्या भागाकडे म्हणजेच “टेल टू हेड” सोडावे अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांची विधानसभेत केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीं सकारात्मक उत्तर दिले आहे.

कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद, पडोळकरवाडी, शिरनांदगी, मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर बु, सलगर खु, बावची, पौट, आसबेवाडी, लवंगी, शिवणगी, येळगी, सोड्डी, या १८ गावांना टेल टू हेड प्रमाणे पाणी मिळण्यासाठी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत आपली मागणी लावून धरली होती. आमदार आवताडे यांच्या या मागणीची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी सदर मागणीवर सकारात्मकता दर्शवून हे पाणी संबंधित मंगळवेढा तालुक्यातील गावांना देण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन कालवा सल्लागार समितीची बैठक सांगली येथे पार पडली होती. सदर बैठकीमध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी, म्हैसाळ उपसा सिंचन पाणी योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यासाठी सांगली जिल्हा जलसंपदा विभाग अंतर्गत म्हैसाळ कालवे उपविभाग वितरिका क्रमांक -२ अन्वये तरतूद असणारे पाणी पूर्णदाबाने देण्यात यावे, त्याचबरोबर वरील भागांना या योजनेतून ज्या पद्धतीने पाणी मिळते त्याच पद्धतीने पाण्याचे वाटप मंगळवेढा तालुक्यातील जनतेसाठी करण्यात यावे, अशी मागणी केली होती.

त्या बैठकीमध्ये आमदार आवताडे यांच्या या मागणीची दखल घेऊन टेल टू हेड अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांना या पाण्याची तरतूद करण्याचे सांगली व सोलापूर जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांना आदेशित करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नवनाथ खिल्लारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा