मुंबई, २७ मे २०२३ : बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी अनेक वर्षाच्या शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आले. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला होता. परंतु आता या आनंदावर पाणी फिरले आहे. प्राणी मित्रांनी काही गोष्टींवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली तयारी केली आहे.
राज्य सरकारच्या नव्या नियमावलीनूसार गावच्या संस्कृती परंपरेनुसारचे धार्मिक सण, उत्सव, यात्रा यासाठीच बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता बैलगाडा शर्यतींवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, राजकीय पुढारी किंवा नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त शर्यती घेता येणार नाहीत असे परिपत्रकात म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर, राज्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले होते. त्याचबरोबर या निकालाची श्रेय घेण्याची ही चढाओढ लागल्याचे दिसून आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य सरकारने नवीन नियमावली बनवली आहे. यावर राजकीय पक्ष काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर