बंडगार्डन पोलिसांची कारवाई : सराईत गुन्हेगाराच्या ताब्यातून देशी पिस्तूल हस्तगत

बंडगार्डन पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत रेकॉर्डवरील सराईत आरोपीच्या ताब्यातून देशी बनावटीचे मॅग्झीनसह पिस्तूल जप्त केले आहे. मालधक्का रोडवरील रेल्वे कोर्टाच्या सीमाभिंतीजवळ संशयित इसम थांबलेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने सापळा रचून आरोपी देव दिनेश परमार (वय २३, रा. ताडीवाला रोड, पुणे) याला ताब्यात घेतले.

त्याची अंगझडती घेतल्यावर पिस्तूल मिळून आले. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. २८०/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त संगिता आल्फान्सो शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता यांच्या पथकाने केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी दिनेश वढणे