छत्रपती संभाजी नगर ३ मार्च २०२४ : छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील तिडका आणि पहुरी गावांत शुक्रवारी दिवसा चोरट्यांनी दोन घरे फोडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह २ लाख ५३ हजारांचा ऐवज लंपास केला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तिडका येथे दिलीप लक्ष्मण बांबर्डे हे पत्नीसह बाळाला घेऊन बनोटी येथे दवाखान्यात घेऊन गेले होते. हीच संधी साधून शुक्रवारी दुपारी तीन वाजता चोरट्यांनी त्यांच्या घर फोडून रोख २० हजार रुपये व सोने-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
दुसरी घटना पहुरी येथे घडली. येथील शेतकरी वसंत मगर यांनी कपाशी विक्री करून एक लाख रुपये घरात ठेवले होते. त्यातून घरखर्चासाठी त्यांनी पंधरा हजार रुपये खर्च केले होते. ते शुक्रवारी गोंदेगाव येथे गेले असता चोरट्यांनी त्यांचे घर फोडून रोख ८५ हजार रुपये लंपास केले. दरम्यान, पोलिस निरीक्षक पंकज बारवाल, पोलिस उपनिरीक्षक रज्जाक हुसेन, पोलिस उपनिरीक्षक सतीश बडे, संदीप सुसर, राजू बर्डे, विकास दुबिले यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय चौधरी