उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली; २५ जणांचा मृत्यू

5

डेहराडून, ५ ऑक्टोंबर २०२२: उत्तराखंडमध्ये ४० हून अधिक प्रवासी असलेली बस दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पंचवीस लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पौडी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावाजवळ असलेल्या रिखनीखाल-बिरोखल महामार्गावर ही घटना घडली आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन ही बस लालढांगहून काडा तल्ला इथे जात होती. बिरोखाल येथील सीमडी बँडजवळ बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळली.

डीजीपी अशोक कुमार यांनी अधिक महिती देताना सांगितले की, पौरी गढवालच्या बिरखल भागात मंगळवारी रात्री झालेल्या बस अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि एसडीआरएफने २१ जणांची सुटका केली आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरिद्वार शहराचे एसपी स्वतंत्र कुमार सिंह यांनी रात्री उशिरा बस अपघाताची माहिती दिली. लालधंग येथून ही बस निघाली होती. वाटेतच या बसचा अपघात झाला.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून शोक व्यक्त

दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेची माहिती घेतली आहे. पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या अपघाताविषयी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली असून घटनास्थळी SDRF ची टीम पाठवण्यात आली आहे, सर्व जखमी प्रवाशांना बाहेर काढले जात आहे. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असेही धामी यांनी यावेळी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा