बुलढाणा, १ जुलै २०२३ : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर अत्यंत भीषण अपघात झाला आहे. नागपूरहून पुण्याला जाणारी खासगी बस पलटी झाली. त्यानंतर या बसला आग लागली. आगीने मोठ्या प्रमाणावर पेट घेतल्याने या बसमधून प्रवास करणाऱ्या २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. या भीषण आगीमुळे बसचा अक्षरश: कोळसा झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच फायरब्रिगेड, पोलिसांनी आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरु केले.
ही खासगी बस नागपूरहून पुण्याला जात होती. रात्री एक ते दीडच्या सुमारास हा अपघात झाला. मध्यरात्री समुद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा जवळील पिंपळखुटा गावात अचानक बस पलटी झाली. त्यानंतर बसला आग लागली आणि बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. बस पलटी झाल्याने प्रवाशांना बसमधून बाहेर पडता येत नव्हते. बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता. अनेक प्रवासी बाहेर पडण्यासाठी धडपड करत होते. किंचाळ्या, आक्रोश सुरू होता, पण त्यांना बाहेर पडता येत नव्हते. आग मोठी असल्याने इतरांनाही त्यांना बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे या बसमधील २५ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर चालक आणि वाहकासह तीनजण या अपघातातून बचावले आहेत. या बसमधून ३३ प्रवाशी प्रवास करत होते.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा, महसूल विभाग, ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्यास सुरुवात केले. या सर्वांनी तात्काळ बचावकार्य सुरू करत आठ जणांचे प्राण वाचवले. तसेच बसमधील २० प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे चेहरेसुद्धा ओळखू येत नसल्याने, त्यांची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान आहे. या सर्व मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या मते समृद्धी एक्सप्रेसवेवर डाव्या बाजूला बस लोखंडी खांबाला धडकली. त्यानंतर बस अनियंत्रित झाली आणि डिव्हायडरला जाऊन धडकली. त्यामुळे बस पलटी झाली. त्यामुळे बसचा दरवाजा खालच्या बाजूला पडला. त्यामुळे बाहेर पडण्याचा मार्गच बंद झाला. काही प्रवाशी खिडक्या तोडून बाहेर पडले म्हणून ते वाचले. बाकीच्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर