अफगाणिस्तानातून सैन्य काढण्याच्या निर्णयावर बुश यांनी बायडेन सरकारवर केली जोरदार टीका

5

जर्मनी, १६ जुलै २०२१: अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी अध्यक्ष जो बायडेन यांच्या अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. बुधवारी ते म्हणाले की, आता तालिबानी मनमानी करतील आणि निर्दोष नागरिकांची हत्या करतील. अमेरिकेसह नाटो सैन्याने माघार घेतल्यामुळं तालिबानला मोकळे मैदान मिळाले आहे.

बुश यांनी जर्मन रेडिओ डॉयचे वेले’ला सांगितले की, अमेरिकन सैन्य माघारी आल्यामुळं अफगाणिस्तानच्या महिला आणि मुलींना याचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागणार आहे. ही एक चूक आहे … अफगाणिस्तानातील महिलांना आता तालिबान्यां कडून ठार मारले जाईल. हे लोक (तालिबान) अत्यंत क्रूर आहेत. या निर्णयामुळे त्यांना (बुश) दुःख झालंय.

माजी अध्यक्ष म्हणाले, “पत्नी लॉरा (बुश) आणि मी अफगाण महिलांबरोबर बर्‍यापैकी वेळ घालवला, त्या घाबरून गेल्या आहेत, मला फक्त त्या सर्व लोकांची चिंता वाटते ज्यांनी केवळ अमेरिकन सैनिकच नव्हे तर नाटो सैनिकांना देखील खूप मदत केलीय, ते क्रूर लोकांच्या हातून मारले जाणार आहेत. या निर्णयानं मला खूप दुःख झालं आहे. ”

तथापि, बुश यांनी जर्मन चांसलर अँजेला मर्केलचे कौतुक केले. ते म्हणाले की, सत्तेच्या १६ वर्षांच्या काळात, मर्केल यांनी “वर्ग आणि प्रतिष्ठा” अत्यंत महत्वाच्या पदावर आणली. यावर्षी राजकारणातून संन्यास घेणाऱ्या मर्केल यांनी त्यांच्या राजवटीत अतिशय कठीण निर्णय घेतले.
न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ९/११ च्या हल्ल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी तालिबानशी सामना करण्यासाठी अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात पाठवलं होतं. तालिबान विषयी म्हणताना जॉर्ज डब्ल्यू बुश म्हणाले की जर्मन चांसलर मर्केल सुद्धा असाच विचार करत असतील, त्यांना याची जाणीव आहे.

बायडेन यांची भूमिका:

बुश अफगाणिस्तानातून सैन्य मागं घेतल्याबद्दल दुःख व्यक्त करीत असले तरी अमेरिकेनं आपली उद्दिष्टे साध्य केली असल्याचे अध्यक्ष बायडेन यांचं म्हणणं आहे. ते म्हणाले की, आम्ही अल-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला मारले. आमचा हेतू साध्य झाला आहे. आम्ही राष्ट्र उभारणीसाठी अफगाणिस्तानात गेलो नाही. त्यांना आपला देश कसा चालवायचा आहे हे ठरविणे केवळ अफगाण लोकांचा हक्क आणि जबाबदारी आहे. ते त्यांचं स्वतःचं भविष्य ठरवतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा