नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर २०२०: पैगंबर मोहम्मद यांच्यावर बनवण्यात आलेल्या कार्टूननंतर फ्रान्समधील एका शिक्षकाची गळा कापून हत्या झाल्यानंतर चर्चमध्ये घुसून दहशतवादी हल्ल्याची घटना घडली. जगभरातील मुस्लिम जगतात याचे पडसाद उमटले असून अनेकजण या हत्येचे समर्थन करत आहेत. या कट्टरतेची निंदा देखील केली जात आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी फ्रान्समध्ये झालेली दहशतवादी घटना चुकीची असल्याचं म्हटलं आहे.
एक खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना ओवेसी यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. “जिहादच्या नावानं निष्पापांचा बळी घेणारे खुनी आहेत. इस्लाम त्याचं समर्थन करत नाही. आपण जिथं राहतो त्या देशातील कायद्याचं पालन करायलाच हवं. तुम्ही कुणाचीही हत्या करु शकत नाही. तुम्हाला तसा अधिकार नाही”, असं ओवैसी म्हणाले.
फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील एक शिक्षक सॅम्युएल पॅटी यांनी फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन या विषयावर वर्गात शार्ली एब्दो मासिकात २०१५ मध्ये छापून आलेल्या पैगंबर मोहम्मद साहेब यांचं कार्टून दाखवलं होतं. हे कार्टून पाहून राग आलेल्या एका विद्यार्थ्याने १६ ऑक्टोबरला शिक्षकाचं धड शरीरापासून वेगळं केलं. या नंतर फ्रान्सनं इस्लामी कट्टरपंथीयांविरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारला. यानंतर जगातील मुस्लिम देशांनी फ्रान्सचा निषेध केला. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांचाही निषेध होऊ लागला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे