मुंबई, १७ जुलै २०२३ : पावसाळी अधिवेशन आजपासून (१७ जुलै) सुरू होत आहे. मात्र याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली खाती इतर मंत्र्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही खाती वर्ग करण्यात आली आहेत. ही सर्व खाती शिंदे गटाच्या आमदारांनाच देण्यात आली आहे. अधिवेशन काळात सभागृहामध्ये या खात्यांसंदर्भात जे काही प्रश्न उपस्थित केले जातील त्याची उत्तरे या मंत्र्यांकडून दिली जाणार आहेत.
शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन, उदय सामंत यांच्याकडे नगरविकास आणि माहिती तंत्रज्ञान, शंभूराज देसाईंकडे सामाजिक न्याय आणि दिव्यांग, दादा भूसे यांना परिवहन, अब्दुल सत्तारांकडे खनिकर्म आणि दीपक केसरकर यांच्याकडे पर्यावरण खाते देण्यात आले आहे. आठ दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामधील मंत्र्यांचेही खातेवाटेप झाले आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्याकडे – अर्थ, नियोजन, छगन भुजबळ – अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, प्रशासन, दिलीप वळसे पाटील- सहकार,हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण,धर्मरावबाबा अत्राम – औषध व प्रशासन, धनंजय मुंडे – कृषी, अनिल पाटील- मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, आदिती तटकरे- महिला आणि बालकल्याण आणि संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस, सत्ताधारी की विरोधक कोण गाजवणा हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेसचा विरोधी पक्षनेता आजच जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार ही काँग्रेसमधील नावे चर्चेत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर