छत्रपती संभाजीनगर, ६ मार्च २०२३ : औरंगाबादच्या नामांतरावरून तीन दिवसांपासून खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरू आहे. आता छत्रपती संभाजीनगर शहराच्या नामांतरावरून महाराष्ट्र मुस्लिम अवामी कमिटीतर्फे शहर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला विविध पक्ष, संघटनांचा पाठिंबाही मिळत असल्याचे कमिटीचे प्रमुख तथा माजी नगरसेवक इलियास किरमाणी यांनी सांगितले.
तसेच लोकविकास परिषदतर्फे शुक्रवारी (ता. १० मार्च) महामोर्चाही काढण्यात येणार आहे. औरंगाबाद शहराचे व उस्मानाबाद शहराचे नाव बदलल्याच्या निषेधार्थ लोकविकास परिषदेतर्फे येत्या दहा मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे लोकविकास परिषदेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल वाहिद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
लोकविकास परिषदेतर्फे ता. १० मार्च रोजी भडकल गेट येथून दुपारी ३ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून विभागीय आयुक्त कार्यालयावर एक भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चामध्ये नामांतराला विरोध करणारे सर्व जातिधर्मातील शांतताप्रिय नागरिक सहभागी होणार असून, हा मोर्चा शांततेच्या मार्गाने निघून विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता होणार असल्याचे सय्यद अब्दुल वाहेद यांनी यावेळी सांगितले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले