वाघोली, ६ डिसेंबर २०२०: वाघोली मधील एका नामांकित हॉस्पिटलच्या बांधकामाला कुठल्याही प्रकारची मंजुरी व परवानगी नसताना देखील सदर बांधकाम पूर्णपणे अनाधिकृत असताना सुद्धा हॉस्पिटलला आरोग्य विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र दिलेच कसे असा सवाल पुणे भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस संदीप सातव यांनी उपस्थित केला आहे.
या हॉस्पिटलला बॉम्बे नर्सिंग अॕक्ट एमपीसीबी प्रमाणपत्र, बीएमडब्ल्यू प्रमाणपत्र देते वेळेस घालून दिलेल्या अटी व शर्तीचे हॉस्पिटलकडून वारंवार उल्लंघन होत असताना देखील प्रशासन यांच्यावर कारवाईचे धाडस का दाखवत नाही…? त्यामुळे अशा हॉस्पिटलवर आरोग्य विभागाने त्वरीत कारवाई करून या हॉस्पिटलचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करावे ही मागणी करण्यात आली आहे.
हॉस्पिटलमध्ये कोविड काळात देखील बिलामध्ये नागरिकाकडून भरमसाठ आर्थिक लूट करण्यात आली असून हॉस्पिटलने कोविड काळात सर्व रुग्णांना आकारण्यात आलेल्या बिलाचे आरोग्य विभागाकडून ऑडिट करून रुग्णांकडून शासकिय नियमापेक्षा अतिरिक्त घेतलेले बिल तातडीने रुग्णाला परत करावे आणि संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करावी असे देखील त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तर हॉस्पिटलचे बांधकाम अधिकृत असल्याचे कागदपत्र दाखल केलेली नसताना देखील हॉस्पिटलला बेकायदेशीरपणे नोंदणी प्रमाणपत्र देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देखील तातडीने कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सातव यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
अशा अनधिकृत आणि नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या हॉस्पिटलवर चार दिवसात कारवाई न झाल्यास आरोग्य विभागा विरोधात मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा संदीप सातव यांनी दिला आहे.
आमच्या हॉस्पिटलचे बांधकाम हे जुने असून या बांधकामाच्या नोंदीबाबत गेले दोन वर्षापासून पीएमआरडीए कडे कागदपत्रांची पुर्तता करून बांधकाम अधिकृत करण्यासाठी जो काही दंड असेल तो भरण्यास आम्ही तयार आहोत. तर हॉस्पिटल प्रशासनाने प्रशासकीय नियमानुसार व पाॕलिशीच्या नियमानुसार सर्व बिले आकारले असून यामध्ये एक रुपयाही जास्तीचे बिल आकारल्याचे आढळल्यास आमच्यावर होणाऱ्या कारवाईस आम्ही तयार आहोत.
आयमॅक्स हॉस्पिटल
डॉ. रघुनाथ रामकर, वाघोली यांनी याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी आणि हवेली तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन घेतला नाही असे बोलताना सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे