दोन हजार रुपयांच्या नोटा रद्द करा; भाजपा खासदार सुशील मोदी यांची मागणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर २०२२ : दोन हजार रुपयांच्या नोटांमुळे काळा पैसा वाढत आहे. त्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटा रद्द कराव्यात, अशी मोठी मागणी भाजपाचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनी सोमवारी केली आहे. यावर आता मोदी सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सुशील मोदी म्हणाले, २००० ची नोट म्हणजे काळा पैसा. त्यामुळे देशातील काळा पैसा थांबवायचा असेल तर २ हजार रूपयांच्या नोटेवर बंदी घालावी लागेल. गेल्या तीन वर्षांपासून २ हजारांची नोट छापली जात नाहीए, त्यामुळे आता २००० रूपयांच्या नोटा चलनात आणण्याचे कोणतेही औचित्य नाही. मी भारत सरकारला विनंती करतो की टप्प्याटप्प्याने २००० रूपयांची नोट हळूहळू मागे घेण्यात यावी.

अमेरिका, चीन, जपान अशा जगातील विकसित देशांमध्ये कोठेही १०० च्या पुढील चनल नाही. मग भारतात दोन हजार रुपयांच्या नोटेची गरज का आहे? असा प्रश्न देखील सुशील मोदी यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

  • २०१६ मध्ये झाली होती नोटाबंदीची घोषणा

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटाबंदीची घोषणा केली होती, त्यानंतर त्याच दिवशी मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. यानंतर पाचशेची नवी नोट आली आणि एक हजाराच्या नोटेऐवजी दोन हजार रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या. नोटाबंदीमुळे काळा पैसा आणि दहशतवादाला आळा बसेल, असे तेव्हा म्हटले जात होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा