रद्द झालेल्या रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांचा परतावा सहा टप्प्यात होणार

5

नाशिक, दि.२६ मे २०२०: लॉकडाऊन काळात रेल्वे प्रवाशांनी केलेल्या आरक्षित जागांचे पैसे परत देण्यासाठी रेल्वे भुसावळ विभागाच्या वतीने वेळापत्रक तयार केले आहे. ते सहा टप्प्यात प्रवाशांना पैसे मिळणार आहे.

उन्हाळ्याच्या सुट्या तसेच लग्नसराई असल्याने मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात रेल्वे प्रवाशांनी रेल्वे जागांचे आरक्षण केले होते. मात्र कोरोनाचा धोका लक्षात घेता रेल्वेने संपूर्ण भारतात प्रवासी वाहतूक बंद केली होती. याकाळात प्रवाशांनी आरक्षीत केलेल्या तिकिटांचे पैसे मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागला. अखेर आज (२६ मे) पासून तिकिटांचा परतावा रेल्वे प्रवाशांना मिळणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये केवळ नाशिकरोड रेल्वे स्थानक इथेच हे परताव्याचे पैसे मिळणार आहे. पैसे घेण्यासाठी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून सहा टप्पे करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात अमरावती, अकोला, खांडवा, बुऱ्हाणपूर, भुसावळ, धुळे, जळगाव, मनमाड आणि नाशिक अशा नऊ रेल्वे स्थानकावर प्रत्येकी दोन खिडक्यांच्या माध्यमातून हे पैसे मिळू शकतील . दरम्यान तिकिटांच्या परताव्याची रक्कम काही लाखात असल्याने संभाव्य गर्दी आणि लागणारा वेळ लक्षात घेता शहरातील तिबेटीयन मार्केट येथील रेल्वे आरक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हे केंद्र शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने प्रवाशांना देखील ते सोयीचे होणार आहे.

पैसे मिळण्याचे सहा टप्पे खालील प्रमाणे
२२ ते ३१ मार्च – २६ मेपासून
१ ते १४ एप्रिल – १ जूनपासून
१५ ते ३० एप्रिल – ७ जूनपासून
१ ते १५ मे – १४ जूनपासून
१६ ते ३१ मे – २१ जूनपासून
१ ते ३० जून – २८ जूनपासून

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा