कॅप्टन १९ सप्टेंबर रोजी भाजपमध्ये जाणार, पक्षाचंही विलीनीकरण करणार, पंजाबमध्ये भाजप देऊ शकते मोठी जबाबदारी

चंदिगड, १७ सप्टेंबर २०२२: पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग १९ सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याच दिवशी अमरिंदर सिंग त्यांचा ‘पंजाब लोक काँग्रेस’ (PLC) पक्ष भाजपमध्ये विलीन करतील. कॅप्टनसोबत पंजाबचे त्यांचे जवळचे ५-६ माजी मंत्रीही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्यानं भाजपने पंजाबमध्ये पक्षाची पुनर्रचना करण्याची तयारी केलीय. अशा स्थितीत पंजाब लोक काँग्रेसचं भाजपमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर पक्ष नेतृत्व कॅप्टन आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर पंजाबमधील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवू शकते.

जानेवारी-२०२० मध्ये पंजाब भाजप युनिटचे प्रमुख बनलेल्या अश्वनी शर्मा यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ जानेवारी-२०२३ मध्ये संपला. तथापि, कॅप्टन पक्षात सामील झाल्यानंतर आणि पीएलसीच्या विलीनीकरणानंतर, त्यापूर्वी भाजप हायकमांड नवीन राज्य कार्यकारिणी जाहीर करू शकते.

मोदी-शहा भेटीनंतर चर्चा सुरू

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पीएलसीचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्याबाबतच्या चर्चेला वेग आला जेव्हा कॅप्टन यांनी एक महिन्यापूर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सुमारे एक तासभर बैठक घेतली.

तथापि, बैठकीनंतर, कॅप्टन बाहेर आले आणि पंजाब लोक काँग्रेस (पीएलसी) च्या भाजपमध्ये विलीनीकरणाचा प्रश्न नाकारला आणि हा केवळ अंदाज असल्याचे म्हटलं. त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर कॅप्टन यांनी ट्विटरवर लिहिलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर पंजाबच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर राज्य आणि देशाच्या सुरक्षेसाठी संयुक्तपणे काम करण्याचा संकल्प केला, जो नेहमीच सर्वोत्कृष्ट असेल.

नवज्योत सिद्धू प्रकरणावरून काँग्रेस हायकमांडशी झालेल्या भांडणानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गेल्या वर्षी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्ष सोडला होता. त्यानंतर त्यांनी ‘पंजाब लोक काँग्रेस’ (PLC) पक्षाची स्थापना केली.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत कॅप्टन भाजपसोबत युती करून रिंगणात उतरले होते. मात्र, ना ते स्वत: त्यांची पटियालाची जागा वाचवू शकले, ना त्यांना राज्यातील इतर उमेदवार जिंकता आले. आम आदमी पक्षाच्या (आप) वादळामध्ये भाजपला विधानसभेत केवळ २ जागा जिंकता आल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा