बारामती, १९ डिसेंबर २०२०: बारामती नगर परिषदेत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामावर असणाऱ्या कामगारांनी कोविड महामारीच्या काळात रात्रंदिवस जीव धोक्यात घालून काम केले याचा मोबदला म्ह्णून त्यांना काँट्रॅक्टरणी गेले चार महिने पगार दिला नाही. तर कोविड रुग्णांना दवाखाण्यातून आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यावर त्यांना जी रक्कम देण्याचे ठरले होते त्यासाठी पालिकेचे अधिकारी व ठेकेदार हे एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने नगराध्यक्षणी कोविड योद्धा म्हणून सन्मानित केलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठी होती. तसेच याच काळात अनेक कोविड रुग्णांच्या मृत्यु झाला. कोरोना हा संसर्गजन्य असल्याने कोविड रुग्णांना घरच्यां लोकांना देखील बघण्यास परवानगी नसताना, पालिकेत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना बाधित रुग्णांवर जीव घोक्यात घालून, तमा न बाळगता, रात्रदिवस न बघता अंत्यसंस्कार केले आहेत.
मात्र, ऑगस्ट महिन्यांपासून त्यांना पगार मिळाला नाही. तर कोविड बाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ठरलेल्या रक्कम देण्यासाठी देखील कॉन्ट्रॅक्टर टाळाटाळ करत आहे. तर अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता ते एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे हताशपणे या कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
या कोविड योध्यांनी जवळपास ३५ रुग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत. मात्र, कॉन्ट्रॅक्टर पालिकेकेकडून बील मिळाले नाही अशी सबब या कर्मचाऱ्यांना सांगत आहे. तर आम्हाला कामाला लागताना जो पगार सांगितला होता त्यापेक्षा कमी पगार मिळत आहे. याबाबत विचारले असता काम करायचे तर करा नाहीतर घरी जा असे सांगत आहे. तर अनेक वेळ नगर पालिकेच्या वाहनाचे किरकोळ काम हे स्वतःच्या पैशाने करा असे अधिकारी दरडावतात.
आधीच कमी पगार आणि खर्च केला तर परवडत नाही पण, कामाची गरज असल्याने बोलता येत नाही, असे कर्मचारी म्हणाले. कोरोना योद्धा म्ह्णून काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मात्र, सन्मानाने पोट भरत नाही असे कर्मचारी म्हणाले. आम्ही कोरोना काळात २ ते ५ कोविड रुगणांवर अंत्यसंस्कार केले आहेत. तर अनेक वेळा बेवारस लोकांवर देखील अंत्यसंस्कार केले आहेत. या बिकट काळात सॅनिटायजर , साबण, अंघोळीची सोय न्हवती तशात आम्ही घरी जायचो आमच्या घरी देखील माणसं आहेत. तर पैशांविषयी विचारले असता आता सगळे तुम्हला कोणी सांगितले होते त्यांना विचारा, म्हणत अंग झटकत आहेत.
अनेक वेळा जेवणाच्या ताटावरून उठून मुसळधार पावसात काम केले आहे आणि आता टाळाटाळ करत आहेत. कोरोना काळात आमचा इंशोरन्स काढू असे आम्हाला सांगितले होते. पण, तसे काही केले नाही. जवळपास ३०० कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करतात हे सर्व कर्मचारी गरजवंत आहेत. यांनी अनेक वेळा कोविड सेंटर मधील स्वच्छतागृह देखील स्वच्छ केले आहेत. तर अनेक वेळा आठ तासांची ड्युटी संपल्यावर औषध फवारणी करणे, धूर फवारणी करणे, कचरा उचलणे अशी जास्तीची कामे करून घेतात त्याचा काहीही मोबदला दिला जात नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
तर एक अंत्यसंस्कार केल्यावर या कर्मचाऱ्याला सात दिवस कोरंटाईन करणे गरजेचे असताना त्यांना रोज कामावर बोलावले जात होते. तर ज्या दिवशी रुग्ण नाही त्यादिवशी मग इतर कामे करण्यासाठी आम्हला पाठवले जात असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव