तिसरी लाट येईल हे गृहीत धरून काटेकोर नियोजन करा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई, ३० एप्रिल २०२१: राज्यात कोरोना ची दुसरी लाट सुरू. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी राज्याला संसर्गाचा मोठा फटका बसताना दिसत आहे. सध्याची स्थिती पाहता जर कोरोना ची तिसरी लाट आली तर भयावह परिस्थिती निर्माण होईल. याची दखल घेत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड परिस्थितीसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. निर्बंधाच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजप्रमाणे या घटकांना तात्काळ लाभ द्यावा. केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनांना दिल्या.

कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील कडक निर्बंधांमुळे काही प्रमाणात रुग्ण संख्या स्थिरावली असली तरी आपल्याला आता अतिशय सावध राहून पुढील तिसऱ्या लाटेचे नियोजन करावे लागेल, कडक निर्बंध लावल्यानंतर लगेचच रुग्णसंख्येत उतार पडेल असे नाही. तरी देखील वेळेत कडक निर्बंध लावल्याने अंदाजित मोठी रुग्ण वाढ आपण रोखू शकलो.

तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग महत्त्वाचा आहे पण त्यासाठी पुरेश्या प्रमाणात व वेळेवर लस पुरवठा अतिशय गरजेचा आहे. आपण आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे मात्र पुरवठ्यावर त्याचे नियोजन करावे लागेल तसेच जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी देखील व्यवस्थित पार पाडावी लागणार आहे.

ऑक्सिजन प्लांट उभारणीत अजिबात दिरंगाई नको

आज ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्सची गरज आहे तिथे आवश्यक त्या परवानग्या दिल्या आहेत, नसतील तर तात्काळ देण्यात येत आहेत मात्र कोणत्याही परिस्थितीत येत्या काळात पुरेसा ऑक्सिजन रुग्णांसाठी उपलब्ध राहील याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावयाची आहे व यासाठी कोणतेही कारण चालणार नाही असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्ह्णून आवश्यक त्या औषधांचा साठा आत्तापासून करून ठेवा. यासंदर्भात राज्यातील टास्क फोर्सचे डॉक्टर्स मार्गदर्शन करीत आहेतच. योग्य ती औषधे योग्य त्या प्रमाणात देण्यासाठी उपचार पद्धतीबाबत टास्क फोर्सचे डॉक्टर्स कायम उपलब्ध आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की , ग्रामीण भागातल्या डॉक्टर्सनी सुद्धा त्यांच्या अडीअडचणी या तज्ञ डॉक्टर्सना मनमोकळेपणाने विचारणे गरजेचे आहे. येणाऱ्या पावसाळ्यातल्या आपत्ती लक्षात घेता आवश्यक औषधी व संसाधनांचा साठा जिल्ह्यातील अगदी कानाकोपऱ्यात होईल याचेही चांगले नियोजन करावे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा