प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरपची ऑनलाईन विक्री, केमिस्ट संघटनेची तातडीने कारवाईची मागणी

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून कफ सिरप आणि इतर ‘शेड्यूल एच‘ संवेदनशील औषधांची विनाप्रिस्क्रिप्शन सर्रास विक्री होत असल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. हा “डिजिटल विषारी खेळ” हजारो नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा गंभीर आरोप पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनने केला आहे.

केमिस्ट संघटनेने अन्न-औषध आयुक्तांकडे तक्रार केली आहे की, ऑनलाइन कंपन्या कायद्याचे उल्लंघन करून अवघ्या १० ते ३० मिनिटांत औषधांची डिलिव्हरी देत आहेत. औषध विक्रीसाठी प्रिस्क्रिप्शन अपलोड करणे बंधनकारक असले तरी, यात प्रिस्क्रिप्शनची सत्यता तपासली जात नाही; जुनी किंवा बनावट प्रिस्क्रिप्शनही चालतात. यामुळे कफ सिरप निर्भयपणे विकले जात आहेत, ज्यामुळे व्यसनाधीनता वाढण्याचा धोका स्थानिक केमिस्ट व्यक्त करत आहेत.

केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांनी स्पष्ट केले की, “शेड्यूल एच औषधे विकण्यासाठी वैध प्रिस्क्रिप्शन आणि किरकोळ विक्रीचा परवाना आवश्यक आहे, तरीही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर खुलेआम विक्री सुरू आहे. त्यांच्या विरोधात ठोस कारवाई होत नाही.”

ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स कायद्यानुसार ऑनलाईन औषध विक्रीला स्पष्ट बंदी असतानाही, २०१८ चे ई-फार्मसी नियम अद्याप अधिसूचित न झाल्याने ही विक्री सुरू आहे. तर, अन्न व औषध प्रशासनाने ऑनलाईन विक्रीवर बंदी नसली तरी, वैध प्रिस्क्रिप्शन असणे अनिवार्य असल्याचे सांगत, तक्रार आल्यास योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

या गंभीर विषयावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केमिस्ट संघटनेने केली असून, अन्यथा नागरिकांचे आरोग्य अधिक धोक्यात येण्याची भीती आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे