पिंपरी, १३ मे २०२३: जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून प्रकरणी मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसमोर घडली. या प्रकरणी किशोर आवारे यांच्या आई तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आवारे जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होते. त्यामुळे त्यांचे राजकीय विरोधक असलेले आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे आणि त्यांच्यात वाद सुरू होते. मागील सहा महिन्यांपासून किशोर आवारे आणि आमदार सुनील शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे यांच्या पासून आपल्या जिवाला धोका असल्याचे आईला सांगितले होते.
किशोर हे संतोष शेळके यांच्यासोबत फिरत असल्याची बाब सुनील शेळके आणि त्यांच्या भावाला आवडत नव्हती. किशोर यांनी मागील दोन वर्षांपासून स्वताचा वेगळा गट तयार करून सुनील शेळके यांना राजकीय विरोध केला. चुकीच्या कामांबाबत वेळोवेळी निदर्शने केली. या रागातून तसेच त्यांचे राजकीय वर्चस्व वाढू लागल्याने आमदार शेळके यांच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला होता. असं किशोर आवारे यांच्या आईनी सांगितले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर