पुणे, १५ डिसेंबर २०२२: एका माजी कर्मचाऱ्यानं भारतातील आयटी दिग्गज TCS वर अमेरिकेत क्लास अॅक्शन लॉ खटला दाखल केलाय. या कर्मचाऱ्यानं आरोप केलाय की, टीसीएस त्यांच्या देशानुसार कर्मचाऱ्यांशी भेदभाव करते. सीन कॅट्झ नावाच्या या कर्मचाऱ्यानं आरोप केलाय की टीसीएस गैर-दक्षिण आशियाई आणि गैर-भारतीय उमेदवार आणि कर्मचाऱ्यांशी भेदभाव करते. TCS विरुद्धचा हा खटला ७ डिसेंबर रोजी न्यू जर्सीच्या जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आलाय.
सीन कॅट्झ यांनी टीसीएसमध्ये ९ वर्षे काम केलं. यानंतर कॅट्झला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. काढून टाकल्यानंतर, कॅट्झने आपल्या याचिकेत आरोप केलाय की सॉफ्टवेअर निर्यातक कंपनी TCS कडं एक पद्धत आहे ज्या अंतर्गत ते गैर-दक्षिण आशियाई आणि गैर-भारतीय कर्मचार्यांमध्ये भेदभाव करते. टीसीएस अशा प्रकारे कर्मचारी नियुक्ती, बेंचिंग, बडतर्फी आणि पदोन्नतीचे निर्णय घेते, असा कॅट्झचा आरोप आहे. कॅट्झ पुढे म्हणाले की, TCS चे हे धोरण कंपनीमध्ये वरपासून खालपर्यंत लागू करण्यात आलंय.
९ वर्षांपासून प्रमोशन न झाल्याचा आरोप
टीसीएस विरुद्ध खटला दाखल करणाऱ्या शॉन कॅट्झ यांनी म्हटलंय की, कंपनीमध्ये सतत ९ वर्षे काम करूनही त्यांना पदोन्नती मिळाली नाही. अनेक वर्षे पदोन्नती मिळण्यासाठी सर्व पात्रता ते सज्ज असताना ही स्थिती आहे. इतकंच नाही तर व्यवस्थापकांसह ग्राहक कंपन्यांनीही त्यांच्या बढतीसाठी शिफारस केली. असं असतानाही त्यांना बेंच वर पाठवण्यात आलं आणि नंतर नोकरीवरूनच काढून टाकण्यात आलं. बेंच वर असताना कंपनीनं आपल्याला आवश्यक ती मदत केली नसल्याचा आरोप कॅट्झ यांनी केलाय.
TCS मध्ये अभारतीय कर्मचाऱ्यांची संख्या सर्वात कमी!
सीन कॅट्झ यांनी याचिकेत म्हटलंय की, अमेरिकन आयटी क्षेत्रात केवळ १२ ते १३ टक्के दक्षिण आशियाई कर्मचारी आहेत, तर टीसीएसमधील ७० टक्के कर्मचारी दक्षिण आशियाई आहेत. त्यात अमेरिकेत वर्क व्हिसावर काम करणाऱ्या भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. या गुणोत्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काट्झ यांनी आरोप केलाय की TCS गैर-दक्षिण आशियाई आणि गैर-भारतीय कर्मचार्यांमध्ये भेदभाव करते. अशा परिस्थितीत टीसीएसची ही भेदभावपूर्ण वृत्ती पद्धतशीरपणे सुरू असून, त्याचा सर्वाधिक फटका आशियाई आणि बिगर भारतीय कर्मचाऱ्यांना बसत असल्याचं तक्रारीत म्हटलंय. कंपनी नियुक्ती तसेच बढती आणि बडतर्फीमध्ये भेदभाव करत असल्याचा आरोप आहे.
TCS विरुद्ध भेदभावाचं दुसरं प्रकरण
टीसीएसवर अशाप्रकारे गैर-दक्षिण आशियाई कर्मचाऱ्यांशी भेदभाव केल्याचा आरोप कर्मचाऱ्याने दुसऱ्यांदा केलाय. यापूर्वी २०१५ मध्ये जेव्हा कंपनीवर असे आरोप लावण्यात आले होते, तेव्हा TCS ने केस जिंकली होती. तेव्हा अशा भेदभावाच्या आरोपात तथ्य नाही, असं न्यायालयानं निकालात म्हटलं होतं. TCS वरील अमेरिकन कर्मचार्यांवर भेदभावाचे आरोप निराधार असल्याचे सांगत न्यायालयानं 2018 मध्ये खटला फेटाळला.
नोकरीत भेदभाव केल्याचा आरोप
याचिकेत असं म्हटलंय की, प्रक्रियेअंतर्गत नवीन प्रकल्प मिळाल्यावर, टीसीएसला नवीन आणि विद्यमान कर्मचार्यांच्या माध्यमातून कर्मचार्यांची गरज भागवावी लागते. कंपनीचे सध्याचे कर्मचारी बहुतेक ते लोक आहेत जे प्रकल्प पूर्ण केल्यानंतर बेंचवर असतात. कंपनी त्यांना नवीन प्रकल्पांबद्दल माहिती देते आणि कोणत्याही नवीन कर्मचार्याप्रमाणे मुलाखती आणि इतर प्रक्रियांमधून त्यांची नवीन प्रकल्पांसाठी निवड केली जाते. त्यांना ओपन पोझिशन्स म्हणतात. मात्र एखादा कर्मचारी बराच काळ बेंचवर राहिला तर त्याला कामावरून काढून टाकलं जातं. टीसीएसची अंतर्गत टीम आणि थर्ड पार्टी टीमला भारतीय उमेदवारांना आकर्षित करण्याच्या सूचना दिल्याचा आरोप सीन कॅट्झ यांनी केलाय. यामुळेच टीसीएसमध्ये भारतीय आणि दक्षिण आशियाई कर्मचारी मोठ्या संख्येनं आहेत. त्याच वेळी, बिगर दक्षिण आशियाई आणि बिगर भारतीय कर्मचार्यांना खुल्या पदांवर दुर्लक्ष केले जाते, यामुळं त्यांना कंपनीत पुढील नोकऱ्या मिळत नाहीत आणि ते दीर्घकाळ बेंचवर राहून बडतर्फीचे बळी ठरतात.
क्लास अॅक्शन लॉ सूट म्हणजे काय?
सीन कॅट्झने TCS विरुद्ध दाखल केलेला खटला वर्ग कारवाई कायद्याच्या दाव्याच्या कक्षेत येतो. वास्तविक, क्लास अॅक्शन लॉ सूट हा एका मोठ्या गटाचे प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशानं न्यायालयात आणलेला खटला आहे ज्यामध्ये संपूर्ण गटाचं एकसमान नुकसान झालंय. हे ‘प्रातिनिधिक खटले’ या संकल्पनेतून आले आहे, ज्यामध्ये सामर्थ्यशाली प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सामान्य माणसाला न्याय दिला जातो. अशा प्रकरणातील आरोपी सहसा कॉर्पोरेट संस्था किंवा सरकार असतात. सामान्यतः क्लास अॅक्शन सूटमध्ये दिलेली हानी वैयक्तिक स्तरावर कमी असू शकते. या प्रकरणी सीन कॅट्झ यांनी म्हटलंय की, त्यांच्यासारख्या किती कर्मचाऱ्यांना टीसीएसचा त्रास आहे, हे कंपनीच्या तपासातूनच कळू शकेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे