फोनवरून होणार कॅश क्रेडिटचे नूतनीकरण

बारामती, ३० एप्रिल २०२० : बारामती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ज्या शिक्षकांचे पगार जमा होतात त्यांना जिल्हा बँकेकडून रुपये १३ लाखापर्यंत कॅश क्रेडिट दिले जाते. सदरचे कॅश क्रेडिट १२ महिन्यांसाठी दिले जाते. १२ महिन्यानंतर कॅश क्रेडिटचे नूतनीकरण करणे अनिवार्य असते. यावर्षी दिनांक २४ मार्च पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. सर्वत्र संचारबंदी लागू आहे, त्यामुळे मार्च, एप्रिल, मे महिन्यात ज्या शिक्षकांचे कॅश क्रेडिट नूतनीकरण आहे त्यांना नूतनीकरण प्रस्ताव सादर करण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आता फोनवरुन जिल्हा बँकेने कॅश क्रेडिटचे नुतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

नुतनीकरण करण्यासाठी किमान दोन वेळा बँकेत जावे लागते. मात्र संचारबंदीमुळे बँकेत जाणे अवघड झाले आहे. तसेच दिनांक १७ मार्च पासून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे मुख्याध्यापक यांचेकडून पगार व सेवेचा दाखला घेण्यासाठी शाळेत जाणे, जामीनदारांच्या सह्या घेणे, स्टॅम्प विकत घेणे, याही गोष्टी खूप अडचणीच्या ठरत आहेत. या सर्व अडचणी दूर व्हाव्यात याकरिता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस केशवराव जाधव यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन रमेश थोरात यांच्याशी संपर्क साधला. तसेच, कॅश क्रेडिट नुतनीकरणास जनजीवन सामान्य होईपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली होती.

जिल्हा बँकेने संचारबंदी व शिक्षकांची अडचण लक्षात घेऊन कॅश क्रेडिट नूतनीकरणास जनजीवन पूर्ववत होईपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आता कॅश क्रेडिट नूतनीकरण करताना संबंधित शिक्षकाना बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. त्यांची फोनवरून संमती घेऊन नूतनीकरण प्रस्तावासाठी आवश्यक असणारी नाममात्र सभासद फी व लोन प्रोसेसिंग फी घेऊन कॅश क्रेडिट नूतनीकरण करावे. कागदपत्रे लगेच सादर न करता जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर अपूर्ण बाबींची पूर्तता करून घ्यावी, असा लेखी आदेश सर्व शाखांना पाठविण्यात आल्याची माहिती असिस्टंट जनरल मॅनेजर अभिजीत हेगडे  यांनी दिली.

जिल्हा बँकेच्या आदेशाप्रमाणे नूतनीकरण संदर्भातील कार्यवाही होत नसेल तर  शिक्षकांनी थेट मोबाईल वरून संपर्क साधावा असेही  हेगडे यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या या निर्णयाचे बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नेते महादेव गायकवाड, अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी स्वागत केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या निर्णयामुळे कॅश क्रेडिट धारक शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. चेअरमन  थोरात व सर्व संचालक मंडळाने मोठी अडचण दुर केल्याचे  राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस केशवराव जाधव यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा