रत्नागिरी, २ जानेवारी २०२४ : देशातील काजू उत्पादनाच्या ८० टक्क्यांहून जास्त उत्पादन निघणाऱ्या कोकणपट्ट्यात काजूंवर प्रक्रियेचे अनेक छोटे-मोठे उद्योग उभे आहेत. वैयक्तिक मालकीच्या या उद्योगांमधून उत्तम उत्पादनही मिळत असते.मात्रा सध्या खेळत्या भांडवलांचा प्रश्न गंभीर होत आहे. काजू बी मोठ्या प्रमाणावर मिळत असते, मात्र काजू खरेदी करण्याची शक्ती उद्योजकांना कमी पडत असल्याने काजू प्रक्रिया करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काजू उद्योगांना भांडवल मोठ्या प्रमाणात लागते. त्याची कमतरता असल्याने काजू बी असूनही ती खरेदी करू शकत नाही अशी स्थिती उद्योगांसमोर निर्माण होते आहे. शासनाने फळ प्रक्रिया उद्योगांना भक्कम आर्थिक पाठबळ दिले पाहिजे. काजू सारख्या उद्योगांना जेवढे बळ मिळायला हवे तितकेसे मिळत नाही त्यामुळे काजू प्रक्रिया होत नसल्याचे मत रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेचे जयवंत विचारे यांनी मांडले.
लांजा परिसरातील महिलांना दैनंदिन कामातून रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थेने पुढाकार घेत नुकताच केंद्र सरकारच्या ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ उपक्रमातून काजू प्रक्रियेतील अत्याधुनिक यंत्रणाही कार्यान्वित केली आहे. त्यामुळे उत्पादनाचा दर्जा आणि कामाचा वेग विलक्षण वाढला आहे. परिसरातील छोट्या शेतकऱ्यांपासून मोठ्या उत्पादकापर्यंत शेकडो जणांच्या काजू बियांवर प्रक्रिया करून दिली जाते. हा सहकार पातळीवरील उपक्रम जयवंत विचारे यांच्या कुशल मार्गदर्शनातून सुरू आहे.
काजूचे अर्थकारण थोडे वेगळे असते. उसाच्या क्षेत्रात महाराष्ट्रात सर्वाधिक सहकारी कारखाने कार्यरत आहेत. तेथे शेतकऱ्यांचा ऊस खरेदी केला जातो. काही नाममात्र रक्कम त्यांच्या पुढ उचल म्हणून मिळते आणि साखर विकली गेली की उरलेली रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात आणि त्याला पडते, इथे मात्र काजू प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला काज बी विकत घेतानाच त्यांना पूर्ण पैसे द्यावे लागतात, काजू बी खरेदी करण्याचा सीझन साधारण २ महिन्यांचा असतो, या काळात जो कारखाना सर्वाधिक गुंतवणूक करून ठेवू शकतो तो जास्तीत जास्त काळ कारखाना चालवतो, सहकारी पातळीवर काम करताना तर या उद्योजकांना आणखीच मर्यादा येतात. अशा प्रतिकूलतेत जयवंतराव विचारे यांनी हा उद्योग नावारूपाला आणला आहे.
काजू उद्योगांमधून रोजगार निर्माण
विचारे सांगतात की, जगात कोकणातला काजू हा सर्वोत्तम म्हणून समजला जातो. काजुला इतर बाजारपेठेत मोठी मागणी असते. दुर्दैवाने शासनाचे काजू प्रक्रिया संस्था , उद्योगांकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. याकडे गांभीर्याने शासन- प्रशासनाने लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. काजू उद्योग हा कोकणात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करू शकतो.
शासन निर्णयाची अंमलबजावणी नाही
शासनाचे निर्णय हे कागदावरच राहिल्याने उद्योगांना उभारी मिळत नसल्याचे चित्र आहे. राज्यातील काजू फळ पिकांच्या विकासाकरिता महाराष्ट्र राजू काजू मंडळ स्थापन करण्याबाबत शासनाने शासन निर्णय काढलेला आहे तसेच महाराष्ट्रातील काजूच्या सर्वकाच विकासासाठी काजू फळपीक विकास योजना लागू करण्यात बाबत जीआर काढण्यात आलेले आहेत. मात्र हे शासन निर्णय काढत असताना काही भाग कृषि विभाग, सहकार व पणन विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग असे वेगवेगळ्या विभागातून धोरणात्मक शिफारशी व कार्यवाही असल्याने त्यात समन्वय साधला जात नाही. यातून या शासन निर्णयांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही. याकडे शासनाने लक्ष घालून अंमलबजावणी केली तर काजूच्या माध्यमातुन कोकणच्या विकासाला चालना मिळेल व मोठ्या प्रमाणात विकास होऊन भरभराट होईल. असे विचारे यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर