मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल

मणिपूर २९ जुलै २०२३: मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने एफआयआर नोंदवला आहे. मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याची धक्कादायक घटना चार मे रोजी घडली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी एफआयआर नोंदवला असल्याची माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मणिपूर व्हायरल व्हिडिओचे पडसाद देशभरात उमटले होते. संसदेतही या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. केंद्रीय गृह मंत्रालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचाराने ग्रासलेल्या मणिपूरमधील एका व्हिडिओने अवघ्या देशाला सुन्न केले होते. आदिवासी महिलांवर झालेल्या या अन्यायाच्या घटनेचा तपास केंद्रीय तपास संस्था सीबीआय करणार आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील विरोधकांनी गदारोळ घालत या घटनेबाबत निषेध दर्शवला. आता मणिपूरमधील या घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने तपासला वेग मिळणार असल्याचे बोलले जात आहे. ज्या मोबाईल फोनवरून हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता तो फोन आणि संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा फोन सीबीआयला सुपूर्द करण्यात आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा