‘सीबीआय’ने १८ नौदल कर्मचाऱ्यांसह ३१ जणांवर एफआयआर नोंदविला, प्राप्तिकरात हेराफेरीचा आरोप

केरळ, १७ जानेवारी २०२३ : केंद्रीय अन्वेषण ब्युरोने २०१६-१७ च्या मूल्यांकन वर्षापासून कन्नूर, केरळमध्ये सुमारे ४४ लाख रुपयांच्या बनावट उत्पन्न परताव्याच्या आरोपाखाली १८ भारतीय नौदल कर्मचारी आणि दोन केरळ पोलिस कर्मचाऱ्यांसह ३१ जणांविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे. आयटी कायदा-१९६१ च्या आयपीसी कलम ४२० (फसवणूक), १२०-बी (गुन्हेगारी कट) आणि २७६सी (मुद्दाम प्राप्तिकर चुकवण्याचा प्रयत्न) अंतर्गत तपास एजन्सीने एफआयआर नोंदविला आहे. खरं तर याप्रकरणी केरळचे आयकर सह आयुक्त (तांत्रिक) टीएम सुगंथमाला यांनी तक्रार दाखल केली होती.

कन्नूरमधील अनेक पगारदार २०१६-१७ पासून बोगस परताव्याचा दावा करीत आहेत आणि काही एजंट शुल्क म्हणून परताव्याच्या रकमेच्या १० टक्के रक्कम गोळा करून काहींसाठी प्राप्तिकर रिटर्न भरत आहेत.

एफआयआरमध्ये, सुगंथमाला म्हणाल्या, ”मूल्यांकन अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीतून असे दिसून आले, की हे लोक फॉर्म-१६ मध्ये समाविष्ट नसलेल्या विविध कपात करून बोगस रिफंडचा दावा करीत होते. तथापि, काही प्रकरणांमध्ये, त्यांनी त्यांचे दावे चुकीचे असल्याचे मान्य केले आहे आणि व्याजासह परताव्याची रक्कम दिली आहे. सुगंथमाला म्हणाल्या, की एकूण ५१ पगारदार लोकांनी काही एजंटांच्या संगनमताने प्राप्तिकर परताव्याचे खोटे दावे केले आहेत.

प्राप्तिकर परतावा मिळालेल्या ५१ करनिर्धारकांपैकी २० जणांनी विभागाला नोटीस बजाविल्यानंतर २४.६२ लाख रुपये परत केले आहेत. प्राप्तिकर परताव्याचा दावा करण्यात आपली चूक झाल्याचेही त्यांनी मान्य केले. भारतीय नौदलाचे १८ कर्मचारी आणि केरळ पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांसह उर्वरित ३१ कर्मचाऱ्यांनी खोटे दावे केले होते आणि त्यांना प्राप्तिकर परतावा मिळाला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले, की त्यांनी विभागाला सुमारे ४४ लाख रुपये अद्याप दिलेले नाहीत, जे त्यांनी खोट्या दाव्यांवर खिशात घातल्याचा आरोप आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा