सीबीएससी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आता ओडियासह २२ भाषांमध्ये शिक्षण घेता येणार

भुवनेश्वर, ओडिशा २३ जुलै २०२३ : आत्तापर्यंत सीबीएससी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे माध्यमे म्हणून केवळ इंग्रजी आणि हिंदी भाषेला परवानगी होती. आता मात्र विद्यार्थ्यांना २२ भाषांमध्ये शिक्षण घेता येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओडियासह २२ भाषा आता देशभरातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिक्षणाचे माध्यम असतील. CBSE ने शुक्रवारी या संदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे आणि त्यांच्या शाळांमध्ये इतर भाषांना शिक्षणाचे माध्यम म्हणून परवानगी दिल्याची माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.

ते म्हणाले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) च्या तरतुदींनुसार इयत्ता १ ते १२ पर्यंतच्या शिक्षणाची नवीन माध्यमे जोडण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण मिळाले तर त्यांना तो विशिष्ट विषय हिंदी किंवा इंग्रजीपेक्षा चांगला समजतो. त्यामुळे शाळा आता या २२ भाषांमध्ये अभ्यासासाठी तरतूद करणार आहेत. एनसीईआरटीलाही त्यानुसार पाठ्यपुस्तके तयार करण्यास सांगितली असून या भाषांमध्ये परीक्षा घेण्याचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या निर्णयानंतर अमित शहा यांनी देखील ट्विट करत लिहिले आहे की, मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या मोदीजींच्या संकल्पावर भर देत सीबीएसईचा १२वीपर्यंत भारतीय भाषांमध्ये शिक्षण देण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. यासाठी मी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानजी यांचे अभिनंदन करतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळाल्याने त्यांची विचार करण्याची, तर्क करण्याची आणि संशोधन करण्याची क्षमता तर वाढेलच पण या उपक्रमामुळे अधिकाधिक विद्यार्थी आता सीबीएसईच्या माध्यमातून शिक्षण घेऊ शकतील.”

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा