इंदापूर, दि.११ मे, २०२०: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वाढदिवस हा महत्त्वाचा दिवस असतो. मात्र सध्या कोरोना या महाभयंकर संकटाशी सामना करत असताना ४५ दिवसांहून अधिक काळ संचारबंदी व जमाव बंदी असल्याने समाजातील गोरगरीब व्यक्तींना अन्नधान्या बरोबरच जीवनावश्यक वस्तूंची गरज भासत आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सलग तीन दिवस किराणा मालाचे वाटप करून वाढदिवस साजरा करत असल्याचे इंदापूर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती देवराज जाधव यांनी सांगितले.
पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य इंदापूर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष देवराज जाधव यांनी आपला वाढदिवस साजरा न करता निमगाव केतकी या पंचक्रोशीतील सर्व समाजातील गोरगरीब, निराधार, गरजू ,अपंग, महिला, कामगार ,नागरिकांना किराणा मालाचे वाटप करून खऱ्या अर्थाने आपला वाढदिवस साजरा केला.
हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस मी देखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इथपर्यंत पोहोचलो आहे. याच दिवशी समाजाची सेवा करणे हे माझे आद्य कर्तव्य समजतो म्हणून सलग तीन दिवस माझ्या गोरगरीब माता-भगिनींना मी किराणा मालाचे वाटप करीत आहे. आत्तापर्यंत १ हजाराहून अधिक कुटुंबांना मदत पोहोचली असून पुढील दोन दिवस हा मदतीचा ओघ सुरूच राहणार आहे. वेळप्रसंगी आणखीन दोन दिवस वाढवून किराणा वाटप केले जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
यावेळी अत्यंत स्वच्छता ठेवून सोशल डिस्टन्सचे पालन करत देवराज जाधव प्रतिष्ठान, अष्टविनायक नागरी सहकारी पतसंस्था, सिद्धिविनायक व मयूरेश्वर सहकारी पतसंस्था या पतसंस्थांच्या सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ ,कर्मचारी , पिग्मी एजंटांनी शिस्तबद्धरित्या या किराणा मालाचे वाटप केले. अत्यंत शिस्तीत आणि रांगेत हे वाटप करण्यात आले.
यावेळी या उपक्रमाचे प्रमुख आयोजक निमगाव केतकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच तुषार जाधव “न्यूज अनकट” शी बोलताना म्हणाले, आम्ही नेहमीच राजकारणाबरोबरच समाजकारणाला अधिक महत्त्व देत असून कोणत्याही संकटात एक पाऊल पुढे जाऊन समाजहित जोपासत असतो.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे