प्रार्थना आणि ‘मेरी ख्रिसमस, हॅप्पी ख्रिसमस’च्या शुभेच्छांनी ख्रिसमस सण हर्षोल्हासात साजरा

ख्रिसमसनिमित्त शहरात इव्हिनिंग पार्टी आणि सेलिब्रेशन

पिंपरी, ता. २६ : आकर्षक सजावट, चमचमणारे चर्च, लख्ख उजेडात चमकणारी सजावट, सकाळपासून चर्चमध्ये सुरू असणाऱ्या प्रार्थना आणि ‘मेरी ख्रिसमस, हॅप्पी ख्रिसमस’च्या शुभेच्छा अशा गोड गुलाबी वातावरणात रविवारी ख्रिसमसचा सण हर्षोल्हासात पार पडला. शहरात सर्वत्र ख्रिसमसच्या निमित्ताने इव्हिनिंग पार्टी आणि सेलिब्रेशनचे वातावरण होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील चर्चमध्ये दिवसभर गर्दी होती. चर्चमध्ये ख्रिसमसच्या आदल्या रात्री ख्रिसमस इव्ह साजरी करण्यात आली. यामध्ये येशू जन्माची कहाणी, सर्वधर्म समभाव, सर्वत्र समानता, मानवधर्म, मानवता, देवावर विश्वास ठेवून सेवा, क्षमा आणि शांततेचा संदेश दिला. सकाळी लवकर चर्चमध्ये प्रेयर्स सुरू होत्या. नंतर दिवसभर येशू जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

ख्रिसमसच्या दिवशी शहरातील केक्स शॉप्स आणि गिफ्ट शॉप्समध्येही गर्दी पाहायला मिळाली. ख्रिसमससाठी खास प्लम केक, फ्रेश केक, मफीन्स या गोष्टींची मागणी होती. काही ठिकाणी ख्रिसमस थीम पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वीट्स पार्टी अशा गोष्टींचा समावेश होता. ख्रिस्ती बांधवांनी रविवारी प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करीत एकमेकांना ‘मेरी ख्रिसमस’, ‘हॅपी ख्रिसमस’ अशा शुभेच्छा दिल्या. कामगारनगर परिसरातील दी युनायटेड चर्च ऑफ क्राईस्ट, काळेवाडीतील केडीसी चर्च, चिंचवडमधील सेंट झेवियर चर्च, आकुर्डीतील ट्रिनिटी चर्च, पिंपरी गावातील चर्च, अल्फान्सो चर्च, सेंट फ्रान्सिस चर्च, मुक्ती फौज चर्च, सेंट मेरी चर्च आदी ठिकाणच्या चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवांनी पवित्र मिसा (प्रार्थना) अर्पण करीत एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या. यावेळी लहान मुलांनी डोक्यात लाल टोप्या परिधान केल्या होत्या. तर सर्व चर्चवर रोषणाई करण्यात आली होती. चर्चच्या बाहेर येशू जन्माचा देखावा ठेवण्यात आला होता.

सोशलमीडियावरही ख्रिसमस साजरा
ज्याप्रमाणे शहरात ख्रिसमस साजरा झाला, त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही ख्रिसमस साजरा झाला. त्यात प्रामुख्याने फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामवर यूजर्सना ‘मेरी ख्रिसमस’ केले जात होते. याचबरोबर दूर राहणाऱ्या मंडळींना फोटो, व्हिडिओच्या माध्यमातून मेमरीज पाठविण्याचाही कार्यक्रम दिवसभर सुरू होता.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा