‘ईला फाउंडेशन’तर्फे साजरा झाला भारतातील एकमेव असा ‘घुबड महोत्सव’

पुरंदर (जि. पुणे), २ डिसेंबर २०२२ : ‘ईला फाउंडेशन’ पुणे आणि महाराष्ट्र वनविभाग यांच्या संयुक्त सहकार्याने भारतात साजरा केला जाणारा एकमेव असा ‘घुबड महोत्सव’ म्हणजेच आऊल फेस्टिव्हल हा ईला हॅबीटाट पक्षीविज्ञान केंद्र, पिंगोरी गाव, तालुका पुरंदर, पुणे येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

या महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून, पुणे जिल्ह्यातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मुला-मुलींनी चेहऱ्यावर विविध प्रकारच्या घुबडांचे मास्क लावले होते आणि त्यांनी दिलेल्या घुबड वाचवण्यासाठीच्या घोषणांनी येथील परिसर घुबडमय झाला होता.

घुबड हा मानवासह शेतकऱ्यांचा मित्र आहे. घुबडांबद्दल समाजात मोठ्या अंधश्रद्धा आणि चुकीचे समज आहेत. घुबडांच्या भारतात एकूण ४२ प्रजाती आढळत असून, त्याची संपूर्ण माहिती सर्वांना व्हावी म्हणून या उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या घुबड उत्सवासाठी शेतकरी, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, विविध निसर्गप्रेमी संस्था, छायाचित्रकार, शिक्षक आणि पालक आदींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

असंख्य शाळकरी मुलांनी काढलेल्या, विविध जातींच्या घुबडांच्या चित्रांचे प्रदर्शन या महोत्सवात भरवण्यात आले आहे. या चित्रांवर घुबड या पक्षाला वाचवण्यासाठीचे संदेश मुलांनी लिहिले आहेत. सहभागी असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांनीं लघू नाटिका, गाणी आणि नृत्यातून घुबडाचे निसर्ग साखळीतील महत्त्व, घुबडांच्या बाबतीतील अंधश्रद्धा आणि घुबडांना वाचवण्यासाठीचे संदेश खूपच छान प्रकारे उपस्थितांसमोर मांडले.

या महोत्सवामध्ये घुबडांची शास्त्रीय माहिती, सांस्कृतिक वारसा व महत्त्व समजण्यासाठी घुबडांच्या विविध कलाकृती, चित्रे, गायन, वादन, नाटिका, नृत्य, वक्तृत्व, पोवाडा, रांगोळी, मेहंदीकाम, फेस पेंटिंग व लेख अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. घुबड नाणी, पोस्टाची तिकिटे, विविध वस्तू, फ्रीजवरील घुबड, घुबडांची छायाचित्रे यांचे प्रदर्शन, लघुपट व माहितीपट अशा विविध माध्यमातून येथे घुबडांची जीवनप्रणाली स्पष्ट केली गेली.

या महोत्सवाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. २०१९ मध्ये झालेल्या घुबड महोत्सवात २२ देशांमधील संशोधक पिंगोरी येथे या उत्सवास भेट द्यायला आले होते.

पुरंदरच्या तहसीलदार श्रीमती रूपाली सरनौबत
यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. या वेळी ‘ईला फाउंडेशन’चे संस्थापक डॉक्टर सतीश पांडे, डॉ. सुरुची पांडे, प्रकल्पप्रमुख राहुल लोणकर, गावातील सहकारी उपस्थित होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा