बारामती, ५ ऑगस्ट २०२०: अयोध्येतील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रामजन्मभूमी वर आज ५ ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. याचा आज बारामती शहरातील अनेक ठिकाणी राममंदिराच्या भूमीपूजनाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील सोळाव्या शतकातील राम मंदिरात पहाटे फुलांची आरास, रांगोळ्या व दिवे लाऊन मंदिर उजळुन निघाले होते. काही ठिकाणी लाडू वाटून तर काही ठिकाणी ढोल वाजवून राम मंदिराचे स्वागत करण्यात आले.
राम जन्मभूमीत मंदिराच्या भूमीपूजनाच्या दिवशी देशात सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना बारामती शहरातील सोळाव्या शतकातील बाळासाहेब देवळेंच्या ऐतिहासिक राम मंदिरात आज पहाटे फुलांची आरास करण्यात आली होती, आकर्षक रांगोळी तसेच सर्व मंदिरात दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. या मंदिरात दरवर्षी रामजन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तसेच शहरातील धर्मरक्षक प्रतिष्ठान व क्षत्रीय ट्रेकर्स यांनी बुंदीच्या सहा हजार लाडूंचा प्रसाद घरोघरी वाटण्यात आला.
यावेळी कोरोना संसर्गाचे सर्व नियम पाळण्यात आले. आजचा दिवस ऐतिहासिक असून आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा असे धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. काही ठिकाणी फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली तर सोशल मीडियावर देखील राम जन्मभूमीत होत असलेल्या भूमीपूजनाचे जोरदार स्वागत करण्यात आले. अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ येथे देखील हलगी वाजवून राम मंदिराच्या भूमीपूजनाचे स्वागत करत येथे लाडू व पेढे वाटण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव, राहुल जाधव, स्वप्नील भागवत, मोहन भाटियानी, निलेश गायकवाड, उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव