लातूर, दि.२९ मे २०२०: कोविड-१९ ही राष्ट्रीय आपत्ती आहे. त्यामुळे याची झळ बसलेल्या देशातील सामान्य जनतेला मदत करण्याची प्राथमिक जबाबदारी केंद्र शासनाची आहे. मजूर, कामगार, शेतकरी आणि सोबतच लघु आणि मध्यम उद्योजकांना केंद्राने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी काँग्रेस पक्षाच्या ‘स्पीक अप इंडिया’ या मोहिमे अंतर्गत बोलताना केली.
कोविड-१९ आणि लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या मजूर, कामगार, शेतकरी लघु व मध्यम उद्योजक व्यावसायिक यांना केंद्र शासनाने मदत करावी, म्हणून अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी( दि.२८)रोजी ‘स्पीक अप इंडिया’ ही मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत फेसबुक, ट्विटर, आणि इतर सोशल मिडियाच्या माध्यमातून बोलताना अमित देशमुख यांनी केंद्र शासनाने जबाबदारी न टाळता सामान्यांच्या मदतीला धावून जाणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.
केंद्र शासनाने प्रारंभी पासूनच कोविड-१९ या आपत्तीची परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही. ही साथ विदेशातून आली आहे. त्यामुळे ती विमानतळावरच रोखता आली असती. बाहेर देशातून येणाऱ्या नागरिकांची त्याच ठिकाणी तपासणी करून योग्य ती खबरदारी घेतली असती तर देशावर एवढे मोठे संकट ओढवले नसते.
त्यांचा परिणाम म्हणून गरीब जनता मोठया संकटात सापडली आहे. मजूर, कामगार यांना घरी जाण्यासाठी शेकडो किमीचा पायी प्रवास करावा लागला. या ठिकाणीही काँग्रेस पक्षच जनतेच्या मदतीला आला. पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या सूचनेवरून अनेक ठिकाणी या कामगार, मजूरांच्या प्रवास खर्चाची सोय पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे, असेही देशमुख म्हणाले.
न्युज अनकट प्रतिनिधी: