दिल्ली २१ जून २०२३: प्रचंड विरोधानंतर केंद्र सरकारने प्रस्तावित पशुधन आणि पशुधन उत्पादन विधेयक २०२३ चा मसूदा मागे घेतला आहे. ७ जून रोजी केंद्रीय मत्सपालन, पशूपालन आणि दुग्धउत्पादन मंत्रालयाने हे विधेयक सार्वजनिक करीत त्यावर आक्षेप सुचना मागवून घेतल्या होत्या. दरम्यान प्रस्तावित विधेयकातील तरतुदीवर अनेक आक्षेप घेण्यात आले. मसुदा मागे घेतांना, विधेयक दुरुस्तीसाठी आणखी वेळ देण्याची तसेच चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
सोबतच प्रस्तावित विधेयकात, पशुकल्याण आणि पशु संवेदनशीलतेबाबत पैलू समाविष्ट करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. पशु अधिकार कार्यकर्ते, दक्षिणपंथी समूह तसेच जैन धर्मगुरूंनी विधेयकावर आक्षेप नोंदवला होता. देशभरातील जैन समाज तसेच अहिंसा आणि शाकाहारावर विश्वास ठेवणाऱ्या समाजांनी विधेयकाला विरोध दर्शवला आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, कृषी मंत्री तसेच संबंधित मंत्रालयाला ई-मेल तसेच स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून निवेदने देण्यात आली होती. माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी देखील या विधेयकाला विरोध दर्शवला होता.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर










































