नवी दिल्ली, २४ डिसेंबर २०२२ :चीनमध्ये BF 7 या नव्या व्हेरिएंटने अक्षरशः कहर माजवला आहे. चीन आणि जपान या दोन्ही देशांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आता भारतही कठोर पावले उचलण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी शनिवारी मोठे वक्तव्य केले आहे.
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे असून आता परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. तसेच चीन, जपान, कोरिया आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंगही केले जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.
चीनमधील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत भारत सरकारकडून नव्याने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना भारतात दाखल होण्यापूर्वी त्यांची सध्याची आरोग्य स्थिती सांगणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच विमानतळावर प्रवाशांमध्ये कोविड १९ ची लक्षणे आढळल्यास किंवा कोविड चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास प्रवाशांना क्वारंटाईन केले जाईल.
दरम्यान, जगभरात सध्या कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसत आहे. भारतातही ओमायक्रॉनच्या BF.7 व्हेरियंटचे चार रुग्ण आढल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तर काही राज्यांनी मास्कसक्ती लागू केली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक