मुंबई,२४ मे २०२३ : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर केंद्र सरकारचा अध्यादेश चुकीचा असून आम्ही केंद्र सरकारच्या अध्यादेशा विरोधात केजरीवाल सरकार सोबत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. केजरीवाल हे दुसऱ्यांदा मातोश्रीवर आली आहेत. नातं जपण्यासाठी मातोश्री प्रसिद्ध असल्याचेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आपल्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी मुंबईमध्ये आले आहेत.आज पहिल्या दिवशी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे सुध्दा उपस्थित होते.
पत्रकार परिषदेमध्ये केंद्र सरकारवर हल्ला करताना केजरीवाल म्हणाले,केंद्रातील सरकारने दिल्लीतील आप सरकरचे सर्व अधिकार हीसकावले आहेत.सरकारच्या याच हुकुमशाही विरोधात आमचा लढा आहे. मोदी सरकार सुप्रीम कोर्टाचे निर्णयही मानत नाही. आमदार फोडून देशभरातील विरोधी सरकार पाडण्याचा मोदींचा धंदा आहे. दिल्लीतील आप सरकार पडता न आल्यामुळे अधिकारांवर घला घातला जात आहे.अहंकारी आणि स्वार्थी माणूस देश चालावू शकत नाही असा हल्लाही मोदी सरकारवर अरविंद केजरीवाल यांनी केला.
पंतप्रधान मोदींकडून लोकशाहीची हत्या केली जात असल्याची टीका पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली. भाजपला देशभरात पराभवाची भीती वाटत आहे. २०२४ ला मोदी सत्तेत आल्यास संविधान बदलतील असे सांगत भाजप विरोधात सगळ्यांनी एकजूट होऊन लढण्याचे आवाहनही भगवंत मान यांनी केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर