उष्माघात रोखण्यासाठी राज्यांत पाठवणार केंद्रीय पथक, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली २० जून २०२३: देशभरातील उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत सार्वजनिक आरोग्य यंत्रणा तयारीचा आढावा घेण्यात येऊन ज्या राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे आणि उष्माघाताच्या घटना घडल्या आहेत, त्या राज्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन, हवामान विभाग आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेले एक पथक पाठवले जाईल. हे पथक राज्य सरकारला मदत करेल, अशी माहिती मांडविया यांनी दिली.

केंद्रीय आरोग्य मंत्री उद्या आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगणा, झारखंड आणि बिहार या पूर्वेकडील राज्यांच्या मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहे. उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी आयसीएमआरला सज्ज राहण्याचा सूचना दिल्या, असेही मांडविया यांनी सांगितले.

देशातील काही भागात मान्सून दाखल झाल्यानंतरही, अनेक राज्ये अजूनही गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तापमानाने त्रस्त आहेत. ओडिशा, झारखंड, बिहार, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात तसेच महाराष्ट्रातील विदर्भात उष्णतेच्या लाटेने उष्माघाताचा धोका वाढला आहे, यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा