नवी दिल्ली, 7 जानेवारी 2022: गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेतील गंभीर त्रुटींची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय पथकाची स्थापना केली आहे. या पथकाला लवकरच चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.
माहितीनुसार, तीन सदस्यीय समितीचे नेतृत्व सुधीर कुमार सक्सेना (सचिव सुरक्षा – कॅबिनेट सचिवालय) करतील आणि त्यात बलबीर सिंग (सहसंचालक, IB) आणि एस सुरेश (IG, SPG) यांचा समावेश असेल.
तत्पूर्वी, गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील उल्लंघनानंतर ट्विट केलं होतं आणि म्हटलं होतं की, गृह मंत्रालयाने पीएम मोदींच्या पंजाबमधील सुरक्षा उल्लंघनाचा तपशीलवार अहवाल मागवला आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षा प्रक्रियेत असा निष्काळजीपणा पूर्णपणे अस्वीकार्य असून जबाबदारी निश्चित केली जाईल.
पीएम मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींवरून पंजाबमधील काँग्रेस सरकारवर निशाणा साधताना अमित शाह यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटलंय की, “पंजाबमधील काँग्रेसने निर्माण केलेली आजची घटना हा पक्ष कसा विचार करतो आणि कार्य करतो याचा ट्रेलर आहे.” जनतेने वारंवार नाकारल्याने काँग्रेस वेडेपणाच्या मार्गावर पोहोचली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या कृत्याबद्दल भारतातील जनतेची माफी मागितली पाहिजे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
खरंतर पीएम मोदी काल फिरोजपूरला पोहोचले होते. येथून त्यांना हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर जायचं होतं. पण खराब प्रकाश आणि पावसामुळं पीएम मोदी 20 मिनिटे थांबले. पण हवामानात सुधारणा होत नसल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाकडे जाण्याचा निर्णय घेतला. या मार्गाने 2 तास लागणार होते. पंजाब डीजीपीकडून सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी केल्यानंतर पंतप्रधान मोदी रस्त्याने निघाले.
मात्र त्यांचा ताफा वाटेत उड्डाणपुलावर येताच आंदोलकांनी त्यांचा मार्ग अडवला. त्यामुळं त्यांचा संपूर्ण ताफा उड्डाणपुलावर उभा राहिला.
यादरम्यान एसपीजीने सुरक्षेबाबत मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते फोनवर आले नसल्याचं बोललं जात आहे. मात्र, काँग्रेसने केंद्र सरकार आणि भाजपचे आरोप साफ फेटाळून लावले आणि सुरक्षेतील त्रुटी असल्याचे मानण्यास नकार दिला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे