गर्भगिरीच्या पर्वतावर घाटशिरस नजीक एका दरीमध्ये श्री आदिनाथ हे वृध्देश्वराच्या रुपाने वास्तव्य करीत आहे. वृध्देश्वराच्या पुर्वेकडे ५ कि.मी. अंतरावर सावरगाव नजीक श्री मच्छिंद्रनाथाच्या उत्तरेस ५ कि.मी. अंतरावर मढी या गावामध्ये एका टेकडीवर कानिफनाथ हे विराजमान झाले आहे.
श्री नऊनारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रुपाने अवतार घेतले. त्याचप्रमाणे श्री प्रबुध्द नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले.
कानिफनाथांनी प्रर्दीर्घ काळ नाथसंप्रदायाचे काम केले. धर्माचे संस्कृतीचे रक्षण केले. नाथ पंथाचे कार्य करीत करीत हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी नगर जिल्हातील मढी या गावी फाल्गुन वद्य(रंगपंचंमी) च्या दिवशी संजीवनी समाधी घेतली. कानिफनाथ मंदिर एका भव्य अशा किल्ल्याप्रमाणे एका टेकडीवर आहे. राणी येसूबाई आणि बाळराजे शाहुमहाराज(पहिले) जेव्हा मोगलांच्या वेढ्यामध्ये होते. तेव्हा राणी येसूबाईंनी श्री कानिफनाथस नवस केला होता कि, जर माझ्या शाहुमहाराजांची सुटका पाच दिवसाच्या आत झाली तर मी कानिफनाथ गडाच्या सभा मंडप, नगारखाना इ. बांधकाम तसेच देवाला पितळी घोडा अर्पण करीन. भक्तांनी दिलेली हाक कानिफनाथांनी ऐकली आणि पाच दिवसांच्या आतमध्ये कानिफनाथाने राणी येसुबाई आणि युवराज शाहुराजे(पहिले) यांची सुखरुप सुटका केली. तेव्हा हा नवस फेडण्यासाठी राणी येसूबाई आणि शाहुराजे (पहिले) यांच्या आज्ञेने बडोद्याचे सरदार श्री पिलाजी गायकवाड यांनी आपला कारभारी चिमाजी सावंत यास मढी येथे पाठवून त्याठिकाणी प्रचंड असे प्रवेशद्वार, नगारखना, सभामंडप, पाण्यासाठी गौतमी बारव इ. भव्य बांधकाम केले तसेच चैतन्य कानिफनाथाच्या समाधीवर वैदीक पध्द्तीने पूजा व्हावी म्हणून तसेच फाल्गुन वद्य ५ (रंगपंचमी) या दिवशी भरणांच्या यात्रेची सर्व व्यवस्था पहवी म्हणून छ्त्रपती शाहू महाराजांनी वेद्शास्त्र संपन्न ब्राम्हण श्री गंगाराम दिक्षित उपनान चौधरी काशीकर (वास्तव्य पैठण) यांना इ.स. १७४३ मध्ये सनद दिली या अस्सल ऐतिहासिक पुराव्यावरुन वैदिक पुजेची परंपरा मराठे राजे नाथांच्या समाधीच्या ठिकाणी ठेवीत. समाधी मंदिरातील पितळी घोडा व सदोदीत तेवणारा नंदादीप सुप्रसिद्ध मराठे सरदार कान्होजी आंग्रे व त्यांचा मुलगा बापुराव आंग्रे यांनी अर्पण केलेला आहे. अशाप्रकारे श्री चैतन्य कानिफनाथ गडाचे ऐतिहासीक महत्त्व प्राप्त झाले.
श्री चैतन्य कानिफनाथांच्या गडावर मुख्य गाभाऱ्यामध्ये नाथांची पवित्र संजीवनी समाधी आहे. नंतर सभा मंडपामध्ये एका बाजूला नाथांचे गादीघर आहे. तेथे नाथ विश्रांती करत. समोरच एक होमकुंड आहे नंतर नाथांच्या गादीघराशेजारीच पूर्वेला श्री भगवान विष्णूचे मंदिर आहे. त्यातील भगवान विष्णूची मूर्ती इतरत्र कोठेही पहावयास मिळत नाही. इतके अप्रतिम लावण्य त्या मूर्तीमध्ये आहे जणू काही श्री मोहनीराजच तेथे अवतरल्यासारखे वाटते. मंदिराशेजारीच श्री हनुमंतरायाची मुर्ती आहे. ती मुर्ती पाहुन भक्तांनी प्रभुकार्य करण्यासाठी सदोदित दक्ष राहिले पाहिजे असा संदेश हनुमंतरायांची मूर्ती देते. नंतर समाधी मंदिराच्या दक्षिणेला नवनाथांचे सर्वात मोठे गुरुबंधू श्री मच्छिंद्र्नाथ यांचे मंदिर आहे. तेथून सरळ पाहिले असता गर्भगिरी पर्वतावरील मच्छिंद्र्नाथाच्या मंदिराचे दर्शन भक्तांना मिळते. समाधी मंदिराच्या पश्चिमेला विठ्ठल-रखूमाईचे मंदिर असून मंदिराखाली नाथांचे साधना मंदिर आहे. जेथे जाण्याकरीता भुयार आहे व तो एक पूर्वीच्या स्थापत्यशात्राचा आदर्श नमूना आहे. त्या साधना मंदिरामध्ये शिवलिंग व नंदी आहे व तेथे असलेल्या खिडकीमधून गार हवा येते व गावाची पश्मिमेकडील पाहणी करता येते. विठ्ठल मंदिराच्या उत्तरेला श्री नवनाथाचे मंदिर व पारायण ठिकाण आहे. समाधी मंदिराच्या उत्तरेला श्री भवानीमातेचे मंदिर असून तेथे डाळींबीचे झाड आहे. त्याला भक्त जणांनी पूर्वी नाथभक्त होऊन गेलेल्या डाळीबाईच्या नावाने संबोधतात व त्या डाळींबीच्या झाडाला भक्त काही तरी संकल्प नवस करुन नाडा(धागा) बांधतात व श्री कानिफनाथ आजही त्या नवसाला पावून भक्तजणांच्या व्यथांचे निर्दालन करतात.
श्री समाधी मंदिरामध्ये श्री नाथांची संजीवन समाधी असून, श्री कानिफनाथांची मनमोहक अशी संगमरवरी दगडाची मुर्ती तसेच नाथांचे वाहन असलेला व कान्होजी आंग्रेनी दिलेला पितळी घोडा व दत्तत्रयाची मुर्ती आहे. तसेच गडावर नगारखाना, बारदारी, भव्य सभा मंडप, पाण्याची टाकी तसेच श्री समाधी मंदिरावरील असलेला प्रचंड कळस व त्यावरील भगवान शंकराचा त्रिशूल हे मुख्य आकर्षण आहे. याच त्रिशूलाला भक्तगण यात्रेमध्ये काठ्या लावून आनंद उपभोगतात. मढी गावामध्ये हनुमंतरायाचे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे श्री भैरवनाथ, श्री दत्त यांचे मंदिरदेखील भक्तांना पावणारी आहे. मढी गावाच्या पूर्वेकडून श्री पवनगिरी नदी वाहत आहे. तेथे नाथ भक्त आवर्जुन भेट देतात. नाथ मंदिराच्या दक्षिणेला एक मोठा पाझर तलाव आहे. त्या तलावाला अर्धी भिंत ही नैसर्गिक आहे. त्या भिंतीवर श्री आदिमाया तुळजापुरची भवानी माता यांचे मंदिर असून तेथे त्यांचे वास्तव्य आहे. या मंदिराच्या उत्तरेला श्री मच्छिंद्रनाथांचे छोटेसे मंदिर आहे. त्याला “लहान मायबा” या नावाने संबोधतात त्याच प्रमाणे गावाच्या दक्षिणेला गर्भगिरी पर्वताच्या रांगा आहेत. त्यांमध्ये एक दर्या आहे. त्याला लेण्यार्दच्या दरा म्हणतात. लेण्यार्दच्या दर्याशेजारीच दुसऱ्या दऱ्यामध्ये एक प्रचंड अशी दगडाची गोटी असून तेथे गावकऱ्यांतर्फे प्रत्येक वर्षी गोवर्धन पुजा होते. तसेच या दर्यामध्ये एक ३ ते ४ मीटर खोलीचा गोसाव्यांचा झरा आहे. या झ्ऱ्याचे वैशिष्ट्ये असे आहे की हा झरा कितीही दुष्काळ पडला तरी याचे पाणी आटत नाही किंवा कमी होत नाही. परिसरातील गर्भगिरी पर्वत हा श्रावण महिन्यामध्ये पाहाण्याजोगा असतो. तसेच मढी गावामध्ये दोन छोट्या व एक मोठी बारव आहे.
फ़ाल्गुन वद्य पंचमीला (रंगपंचमील) मढीला कानिफनाथांची यात्रा भरते. या यात्रेला साधारणतः १० ते २० लाख भाविक महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, आदी प्रांतांमधून येतात. अठरा पगड जातीचे मढी हे पंढरपूर आहे. तेथे त्यांच्या भांडणाचा न्यायनिवाडा होतो. पाडव्याच्या आदल्या दिवशी फुलबागेतील बाजार प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातीचे गाढवाचा बाजार भरतो. मढीची रेवडी तर प्रयेकाची आवडीची आहे. पाडव्याच्या पहाटे भक्तगण कावडीने पाणी आणून नाथांच्या समाधीला स्नान घालतात व धन्य होतात.
अहमदनगरहून पाथर्डी रोडवरील निवडूंगे हे गाव ४२ कि.मी. आहे. तेथून ३ कि.मी. अंतरावर मढी हे गाव आहे. पाथर्डीहून मढी हे गाव १२ कि.मी अंतरावर आहे. मढीपासून श्री मच्छिंद्रनाथ ६ कि.मी., वृध्देश्वर १२ कि.मी. व श्री मोहटा देवी २० कि.मी. अंतरावर आहे. दररोज नगर आणि पाथर्डी बसस्थानकामधून मढीकरिता बसेस आहे. अमावस्या, पौर्णिमेच्या वेळेस जादा बसेसची सोय आहे. त्याप्रमाणे यात्रेच्या वेळी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बस स्थानकांमधून एस.टी. बसेसची सोय केली जाते.
नाथ भक्तांची व्यवस्था करण्याकरिता कानिफनाथ गडाच्या पायथ्याशी रुमची व्यवस्था ट्रस्टने केलेली आहे. त्याचप्रमाणे भाविकांची व्यवस्था, सेवा करण्यासाठी कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी सदोदीत वाट पाहत आहे.
(३.३.२०१७)काल श्री क्षेञ मढी येथे श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या संजिवणी समाधीला तेल लावणे हा पारंपारिक विधी मोठ्या भक्तिभावात व उत्साहात संपन्न झाला.तत्पुर्वी दुपारी ४ वाजता ग्रामस्थांच्या व नाथभक्तांच्या उपस्थितीत नाथांच्या पादुकांचा जलाभिषेक करण्यात आला.व नंतर शंख व नगारा वाद्याच्या गजरात श्री कानिफनाथ महाराज कि जय म्हणत पारंपारिक पद्धतीत नाथांना तेल लावण्यात आले. याञेपूर्वीचा हा महत्त्वाचा विधी मानला जातो. तेल लागल्या नंतर गुढीपाडव्या पर्यंत मढी व निवडुंगे या गावामधे विविध व्रतबंधने पाळली जातात. यात शेतीची कामे, विवाह/वास्तुशांती ई.मंगलकार्ये, गादी व पलंगावर शयन करणे, दाढी/हजामत करणे,नविन कामास प्रारंभ, तसेच घरामधे पदार्थ तळणे ई. कामे वर्ज्य केली जातात.ही खुप वर्षाची परंपरा आहे. सर्व ग्रामस्थांनी एकञ येवुन याञेची तयारी करावी ही त्यामागची भावना आहे.
नाथसंप्रदयाचे आद्यस्थान व भटक्यांची पंढरी म्हणुन श्री क्षेञ मढी येथील याञा राज्यात प्रसिद्ध आहे. या याञेत अठरापगड जातीधर्माच्या समाजाला मान दिला जातो.
होळी ते गुढीपाडवा अशी १५ दिवस ही भव्य याञा असते.
॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः ॥