चाकण चौकात पोलिसांची मनमानी;लाल सिग्नलवर थांबलेल्या ट्रकचालकाला दमदाटी, नागरिकांकडून तीव्र संताप!

11
Truck Driver Harassed by Police at Chakan Chowk
चाकण चौकात पोलिसांची मनमानी

Truck Driver Harassed by Police at Chakan Chowk: चाकण चौकात भरदिवसा वाहतूक पोलिसांकडून सामान्य नागरिकांवर होत असलेला अन्याय पुन्हा एकदा समोर आला आहे. लाल सिग्नलला थांबलेल्या एका ट्रकचालकाला पोलिसांनी विनाकारण दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे वाहतूक व्यवस्थेतील गोंधळ आणि पोलिसांच्या मनमानी कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीच्या मार्गावरून येणारा एक ट्रकचालक लाल सिग्नल लागल्याने चौकात योग्य ठिकाणी थांबला होता. त्याच्याजवळ सर्व वैध कागदपत्रे असतानाही, दोन वाहतूक पोलिसांनी त्याच्याजवळ धाव घेतली. “तू चुकीच्या दिशेने आलास” किंवा “सिग्नल तोडला आहेस” असे खोटे आरोप करत त्यांनी ट्रकची चावी काढण्याचा प्रयत्न केला आणि चालन भरण्यासाठी दबाव टाकला.

या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेले अनेक नागरिक, तसेच सीसीटीव्ही आणि मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, ट्रकचालकाने कोणताही नियमभंग केला नव्हता. या ट्रकचा चालक दररोज याच मार्गावरून जातो आणि त्याने नियमांचे पालन केले होते,
असेही उपस्थित नागरिकांनी सांगितले. तरीही, पोलिसांकडून केली जाणारी ही दडपशाही अत्यंत निषेधार्ह आहे.

सार्वजनिक ठिकाणी कायद्याचे रक्षण करणाऱ्यांकडूनच जर अशी मनमानी केली जात असेल, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे दाद मागावी, असा संतप्त सवाल चाकणकर विचारत आहेत. या घटनेमुळे नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास कमी होत चालला आहे. या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

“न्याय हवा, मनमानी नको!” या मागणीने चाकण चौकात संतापाची लाट उसळली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे