वाघोली, दि. १४ ऑगस्ट २०२०: वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वाघोलीतील चॅलेंज युथ संघाच्या वतीने यावर्षी मंडप न घालता गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन सातव यांनी दिली.
गणेशोत्सव दरम्यान आरोग्याबाबत सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून श्रींची प्राणप्रतिष्ठा करून विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार नाही. संघाच्या वतीने दरवर्षी देखावे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येते परंतु वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी प्रशासनाने निर्बंध घातले आहेत, त्यामुळे सर्व नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. लोणीकंद पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मंडप न घालता साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सातव यांनी सांगितले.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक उपक्रम राबवून शासकीय नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. वाघोली ग्रामपंचायतीने विसर्जनासाठी वॉर्डनिहाय कृत्रिम हौद तयार करावे अशी मागणी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे