चलो अयोध्या’ एकनाथ शिंदे श्री रामच्या दर्शनाला

मुंबई, २६ ऑक्टोंबर २०२२ : देशात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासुन महाराष्ट्रातले नेते आणि त्यांचे अयोध्या दौरे हा विषय गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. राज्यातलं सत्तानाट्य आणि एकनाथ शिंदेंचं बंड यानंतर हा विषय मागे पडला असला तरी आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. तोही एकनाथ शिंदेंच्याच मुळे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

काही दिवसांपूर्वी अयोध्येतील हनुमान गढीचे प्रमुख महंत राजूदास महाराज हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला येण्याचं आमंत्रण दिलं होतं. महंतांचं हे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं होतं. त्यामुळे शिंदे हे अयोध्येला जाण्याची तयारी करत असल्याचं सांगितलं जात आहे.

शिवसेनेतल्या बंडापूर्वी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या तयारीसाठी एकनाथ शिंदे अयोध्येला गेले होते. पण आता बंडानंतर ते स्वतः मुख्यमंत्री या नात्याने तसेच दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर अयोध्येला जाणार आहेत. आगामी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाकडून हिंदू मते आपल्या पारड्यात पाडण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटानेही आपणच खरे हिंदुत्ववादी आहोत आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आपण पुढे घेऊन जात आहोत, हे दाखवण्यासाठी शिंदे गट अयोध्येला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर नोव्हेंबरमध्ये जाणार आहेत. तिथे जाऊन शिंदे श्री रामांचं दर्शन घेणार आहेत. यावेळी शिंदे शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे अनेक आमदारही अयोध्येला जाणार असल्याची माहिती आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा