पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता

पुणे, १९ नोव्हेंबर २०२०: पुढील दोन दिवस पुणे शहर व महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. तर यावेळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्यातील सर्वच भागांत रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. कमी दाबाच्या पट्टयामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी १९ आणि २० नोव्हेंबरला मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्राच्या दक्षिण-पश्चिम आणि पूर्व भागात सध्या वाऱ्यांची चक्रीय स्थिती असून, कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. या पट्टयाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि त्यानंतर विदर्भ मराठवाडयासह संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

खरंतर, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीची चाहूल लागली पण १२ नोव्हेंबरपासून थंडी गायब झाली. यानंतर तापमानात सातत्याने वाढ होत असून गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. सद्य:स्थितीत सर्वत्र रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. परिणामी थंडी गायब झाली आहे. राज्यात ८ ते १३ अंश सेल्सिअसदरम्यान खाली आलेला पारा आता १७ ते २० अंशांपर्यंत वाढला आहे.

दरम्यान, राज्यात पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी. वेळीच तो कोरड्या जागी नेऊन ठेवावा अशा सूचना हवामान खात्याकडून करण्यात आल्या आहे

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा