मुंबई, ८ मे २०२१: गेल्या आठवड्यापासून पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच आहे. रविवारी (ता.२) दुपारनंतर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. मागील काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतोय. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवस महत्त्वाचे असल्याचं सांगत राज्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविलीय.
येत्या १ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तविलीय. त्याची चाहूल महाराष्ट्रालासुद्धा लागली असून राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाडा येथे पावसाच्या सरी बरसत आहेत. साताऱ्यात काही ठिकाणी गारपीटीसुद्धा नोंद झाली होती. आता हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी जिल्हास्तरीय हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यासाठी पुढील पाच दिवस महत्त्वाचे असणार आहेत.
हवामान खात्यानं वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातील विविध ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. तर राज्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत पुढचे चार ते पाच दिवस राज्यासाठी पावसाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणार आहेत. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक विभागानं सोलपुरात आज (८ मे) तुऱळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. ९ ते ११ मे या कालावधीमध्येसुद्धा अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यंदा कोकणात मान्सून येत्या १ जून रोजी दाखल होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १५ मे आणि ३१ मे रोजी पावसाचा अधिकृत अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. मात्र यंदा अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.
मुंबई, ८ मे २०२१:
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे