पालघर, ६ ऑगस्ट २०२० : पालघर जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस पडत असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागातले रस्ते पाण्याखाली गेले असून पालघर, बोईसर, धनानीनगरसह अनेक ठिकाणी घरं आणि इमारतींच्या आवारात पाणी शिरलं, तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याचं वृत्त आहे.
रायगड जिल्हयात गेल्या दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं रायगडमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातल्या सर्व नद्यांना पूर आला असून नदी काठावरच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून जिल्ह्यातल्या जगबुडी, काजळी, बावनदी आणि कोदवली या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. बावनदीला आलेल्या पुरामुळे सकाळी बंद केलेली मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक दुपारनंतर काही प्रमाणात सुरू केली असून एका वेळी एकाच बाजूनं वाहनं सोडली जात आहेत.
मात्र नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे रात्री वाहतूक बंद केली जाण्याची शक्यता आहे. काजळी नदीच्या पाण्याची पातळीही वाढली असून चांदेराई, सोमेश्वर भागाचा संपर्क तुटला आहे.
सांगली जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरु असून वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली. जत, आटपाडी, खानापूर, कवठे महांकाळ या दुष्काळी भागातही पावसानं चांगली सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे.
सातारा जिल्ह्यात आज सकाळपर्यंत सरासरी ५८२.९८ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातल्या प्रमुख धरणांची पाणी पातळी वाढली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या अप्पर वर्धा धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन ते एकूण क्षमतेच्या ८० टक्के भरलं आहे.
अपर वर्धा जलाशयातून अमरावती, बडनेरा , शहरासह मोर्शी ,वरुड आणि ७० गावांना पाणीपुरवठा केला जातो. जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी इथला संत गाडगेबाबा जलाशय पूर्ण क्षमतेनं भरला असून पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी