बारामती, दि. ३० जून २०२०: जळगाव सुपे (ता. बारामती ) येथील शेतकऱ्यांची सात वर्षे वयाची ५० हजार रुपये किमतीची तीन झाडे अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री ( दि २९ ) चोरून नेली आहेत मंगळवारी सकाळी शेतात गेल्यावर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.यापूर्वी देखील चंदनाची झाडे चोरीचे प्रकार या भागात झाले आहेत.
बारामती तालुक्यातील जळगाव सुपे येथील शेतकरी अशोक बाबूराव शेरकर यांच्या शेतातील गट क्रमांक ६८ मधील चंदनाची ५० हजार रुपये किमतीची तीन झाडे अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बुडातून कापून नेली आहेत. यापूर्वी देखील जळगाव सुपे भागात चंदनाच्या झाडांची चोरी झाली आहे.
हे चंदन चोर रात्रीच्या वेळी वस्ती पासून काही अंतरावर जोरजोरात आवाज करणे किंवा काही ठिकाणी दगड मारण्याचे प्रकार करून दहशत माजवून गावातील काही गावगुंडांना हाताशी धरून चोऱ्या करत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे. जळगाव सुपे हा जिरायती भाग असून अशा प्रकारे शेतकऱ्यांनी हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेल्या झाडांची चोरी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या घटनांवर आळा बसण्यासाठी पोलिसांनी या भागातून रात्रीची गस्त घालण्याची गरज असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव