चंदीगड मध्ये १८ डॉक्टरांसह ५४ कर्मचारी क्वारंटाईन
चंदीगड: चंदीगड पीजीआयमधील ६ महिन्यांच्या कोरोना पॉझिटिव्ह मुलीच्या संपर्कात आलेल्या ५४ कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये १८ डॉक्टरांचा समावेश आहे. मुलीला रूग्णालयात ओपन हार्ट सर्जरीसाठी दाखल केले होते. बुधवारी मुलीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले त्यानंतर कर्मचार्यां चे विलगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली मुलगी फगवाराची असून तिला ९ एप्रिल रोजी बालरोग केंद्रात दाखल केले होते. या मुलीला जन्मजात हृदयरोग आहे. यापूर्वी तिला लुधियानाच्या कॉर्पोरेट रुग्णालयात ३६ दिवसांसाठी दाखल केले होते पण परिस्थितीत काही सुधारणा झाली नसल्यामुळे तिला पीजीआयकडे पाठविण्यात आले.
२१ एप्रिल रोजी कोरोनाचा संसर्ग झाल्यावर मुलीला पीजीआयच्या नेहरू हॉस्पिटल एक्सटेंशनकडे पाठविण्यात आले. तिच्यावर कोविड सुविधा केंद्रात उपचार सुरू आहेत. पीजीआयने याबाबत पूर्ण माहिती दिली आहे. मुलीच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चौकशी केली जात आहे. संपर्क साधलेल्या पीजीआय कर्मचार्यां्ना क्वारंटाईन मध्ये पाठवले गेले आहे. मुलीला संक्रमण कोठे व कसे झाले हे शोधण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहेत.