पाचव्यांदा कक्षा बदलत चांद्रयान-३ चंद्राच्या दिशेने झेपावले, ५ ऑगस्ट पर्यंत चंद्राच्या कक्षेत पोहचणार

बंगळुरू, २५ जुलै २०२३ : मंगळवारी चांद्रयान-३ ची पाचवी आणि शेवटची कक्षा वाढवण्याची प्रक्रिया, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या चांद्रयानाचे पृथ्वीपासून किमान अंतर २३६ किमी आणि कमाल अंतर १२७६०९ किमी आहे. म्हणजेच चांद्रयान-३ आता १२७६०९ किमी x २३६ किमीच्या कक्षेत आहे.

पृथ्वीच्या कक्षेतून आता हे यान बाहेर पडेल. पुढील पाच ते सहा दिवसांत म्हणजेच, ३१ जुलै आणि १ ऑगस्टच्या मध्यरात्री चांद्रयान हे चंद्राच्या दिशेने जाईल. पुढे ५ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत ते पोहोचेल आणि २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल.

इस्रो या मोहिमेद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंप कसे होतात हे शोधणार आहे. सोबतच चंद्राच्या मातीचाही अभ्यास करणार आहे. यानातील लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलद्वारे हे संशोधन होणार आहे. प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाल्यानंतर, लँडर २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर १४ दिवस संशोधन करतील. पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास प्रोपल्शन मॉड्यूल हे चंद्राच्या कक्षेत राहून करेल.

चांद्रयान-३ मोहिमेत १४ जुलै रोजी चांद्रयान-३१७० किमी x ३६५०० किमीच्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले. १५ जुलै रोजी प्रथमच कक्षा ४१७६२ किमी x १७३ किमी पर्यंत वाढविण्यात आली. १७ जुलै रोजी, कक्षा दुसऱ्यांदा ४१६०३ किमी x २२६ किमी इतकी वाढवण्यात आली. १८ जुलै रोजी, कक्षा तिसऱ्यांदा ५१४०० किमी x २२८ किमी पर्यंत वाढविण्यात आली. २० जुलै रोजी, कक्षा चौथ्यांदा ७१३५१ x २३३ किमी पर्यंत वाढवण्यात आली. २५ जुलै रोजी, कक्षा पाचव्यांदा १२७६०९ किमी x २३६ किमी पर्यंत वाढविण्यात आली. चांद्रयान आता ३१ जुलै आणि १ ऑगस्टच्या मध्यरात्री पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने जाईल.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा