चांद्रयान-३ मिशनला एक दिवस बाकी, १४ जुलैला होणार लॉन्च

नवी दिल्ली, १३ जुलै २०२३ : चांद्रयान-२ च्या अपयशानंतर पाच वर्षांनी ISRO म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने, पुन्हा एकदा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची तयारी केली आहे. मिशन चांद्रयान-३ उद्या म्हणजेच १४ जुलै रोजी प्रक्षेपित होणार आहे. भारताच्या या मिशनवर जगाच्या नजरा खिळल्या आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावरील जीवसृष्टी आणि पर्यावरणाची माहिती मिळवणे हा याच्या प्रक्षेपणाचा उद्देश आहे.

चांद्रयान-३ हे मिशन चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले तर भारत असे करणारा जगातील चौथा देश बनेल. यापूर्वी हे यश अमेरिका, रशिया आणि चीनच्या नावावर नोंदवले गेले होते. चांद्रयान-३ यशस्वी झाल्यास भारताचे नावही इतिहासमध्ये रचण्यात येईल.

चांद्रयान-३ हे सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केले जाईल. हे एलविएम-३ द्वारे लॉन्च केले जाईल. १४ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता लॉन्च होणार आहे. चांद्रयान-३ पृथ्वीपासून ३,८४,००० किलोमीटर अंतर कापणार आहे.

इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ म्हणाले की, आम्ही चांद्रयान- ३ ची लँडिंग साइट ५०० मीटर x ५०० मीटरवरून २.५ किलोमीटर केली आहे, जेणेकरून ते कुठेही उतरू शकेल. चांद्रयान-३ मध्येही जास्त इंधन असेल, ज्यामुळे प्रवास करण्याची किंवा पर्यायी लँडिंग साइटवर जाण्याची अधिक क्षमता असणे शक्य होईल.

चांद्रयान-३ च्या सुरुवातीचे बजेट इस्रोला ६०० कोटी रुपये अपेक्षित होते, परंतु ६१५ कोटी रुपयांमध्ये हे अभियान पूर्ण झाले. तथापि, चांद्रयान मिशन-२ च्या तुलनेत चांद्रयान मिशन-३ चा खर्च कमी असल्याचे सांगितले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा