अग्निवीर भरती प्रकियेत बदल; आता द्यावी लागणार ‘सीईई’ परीक्षा

नवी दिल्ली, ५ फेब्रुवारी २०२३ : लष्कराने यावर्षी अग्निवीर भरती प्रकियेत बदल जाहीर केला आहे. आता सैन्यात भरती होण्यासाठी ‘सीईई’ परीक्षा द्यावी लागणार आहे. देशभरातील भरती मेळाव्यांदरम्यान शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीपूर्वी संगणक-आधारित ऑनलाइन सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. नावनोंदणी प्रक्रियेतील बदलाची घोषणा करणाऱ्या जाहिराती लष्काराने विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केल्या होत्या.

यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत जारी होण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत अग्निवीरांसाठी भरती प्रकिया वेगळ्या क्रमाने चालत होती. अग्निवीर भरतीसाठीची सुरवात उमेदवारांना प्रथम शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि त्यानंतर त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांद्धारे केली होती. पात्रताधारक उमेदवारांना नंंतर एक सामाईक प्रवेश परीक्षा द्यावी लागत असे आणि त्यांची अंतिम गुणवत्ता यादीच्या आधारे प्रशिक्षणासाठी निवड केली जात होती.

आता या प्रक्रियेत थोडा बदल केला गेला आहे. शारीरिक आणि तंदुरुस्ती चाचणीपूर्वी सामाईक प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे. या परीक्षेत गुणवत्तायादीत येणाऱ्या उमेदवारांनाच नंतर शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी देता येणार आहे. गेल्यावर्षीच्या भरतीमध्ये ‘सीईई’च्या आधी भरती मेळावा आयोजित करण्यात आला होता.

ज्यामुळे मोठी गर्दी आणि मोठ्या प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या. आता केवळ तेच उमेदवार जे ‘सीईई’मध्ये पात्र आहेत ते रॅलीसाठी येतील, ज्यामुळे ते व्यवस्थापित आणि आयोजित करणे सोपे होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा