नववर्षारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत बदल

पुणे, ३० डिसेंबर २०२२ : नववर्ष साजरे करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता लष्कर भागात शनिवारी वाहतूक बदल करण्यात येणार आहेत; तसेच शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. शनिवारी सायंकाळपासून गर्दी ओसरेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

लष्कर परिसरात वाहतुकीस बंद केलेले आणि पर्यायी मार्ग : वाय जंक्शनकडून एमजी रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मशीद चौकाकडे वळविण्यात येणार आहे. ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे येणारी वाहतूक बंद असेल. व्होल्गा चौकाकडून महंमद रफी चौकाकडे येणारी वाहतूक बंद करून वाहनचालकांनी ईस्ट स्ट्रीट रस्त्याने इंदिरा गांधी चौकाकडे जावे. इंदिरा गांधी चौकाकडून महावीर चाैकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, वाहतूक लष्कर पोलिस ठाण्याकडे वळविण्यात येईल. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून ताबूत स्ट्रीट रस्ता मार्गे पुढे सोडण्यात येईल.

शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे :
पूरम चौकातून बाजीराव रस्त्याने शनिवारवाडा याऐवजी पूरम चौकातून टिळक रस्त्याचा वापर करावा. आप्पा बळवंत चौक ते पासोड्या विठोबा चौक हा रस्ता बंद करण्यात येणार असून, आप्पा बळवंत चौकातून बाजीराव रस्त्याने गाडगीळ पुतळ्यापासून जावे. स. गो. बर्वे ते पुणे महानगरपालिका–शनिवारवाडा याऐवजी झाशीची राणी चौकातून इच्छित स्थळी जावे. गाडगीळ पुतळा ते रामेश्वर चौक बंद असून, कुंभारवाडा किंवा सूर्या हॉस्पिटलसमोरील रस्त्याचा वापर करावा.

या रस्त्यांवर ‘नो व्हेइकल झोन’
लष्कर भागात एम.जी. रस्त्यावर १५ ऑगस्ट चौक ते हॉटेल अरोरा टॉवर; तसेच फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौक ते एफसी कॉलेज मुख्य प्रवेशद्वार या रस्त्यावर शनिवारी सायंकाळी सात ते रविवारी पहाटे पाचपर्यंत ‘नो व्हेइकल झोन’ करण्यात आला आहे.

मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई
शनिवारी ‘ड्रंक ॲंड ड्राइव्ह’ची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा